औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अशोक चव्हाण, वित्त व लेखा अधिकारी डॉ. शिवाजी सांगळे व तत्कालीन ‘बीसीयूडी’चे संचालक डॉ. सुरेशचंद्र झांबरे या तिघा जणांनी ३० जुलै रोजी आपल्या पदाचे राजीनामे दिले. ८ दिवसांचा कालावधी लोटला; पण आजपर्यंत डॉ. चव्हाण व डॉ. सांगळे या दोघांनीही कार्यभार मात्र, सोडलेला नाही, हे विशेष ! विद्यापीठातील बीसीयूडी, वित्त व लेखा अधिकारी आणि परीक्षा नियंत्रक हे तीनही संवैधानिक पदे आहेत. यापैकी बीसीयूडी तसेच वित्त व लेखा अधिकारी हे कुलगुरू बदलले की तेही आपोआप बदलले जात असतात. मात्र, या विद्यापीठात असे झालेले दिसत नाही. परीक्षा नियंत्रक डॉ. अशोक चव्हाण यांचा ५ वर्षांचा कार्यकाळ संपलेला आहे.दुसरीकडे गेल्या आठवड्यात डॉ. सुरेश झांबरे यांनी ‘बीसीयूडी’ संचालकपदाचा राजीनामा दिला आणि ते तेथून तात्काळ कार्यमुक्तही झाले. त्यानंतर कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी संगणकशास्त्र विभागप्रमुख डॉ. कारभारी काळे यांची ‘बीसीयूडी’ संचालक पदावर नियुक्ती केली. डॉ. झांबरे वगळले तर अशोक चव्हाण व शिवाजी सांगळे यांच्यावर व्यवस्थापन समितीमध्ये ओढलेल्या ताशेऱ्यांचा काहीही परिणाम झालेला दिसत नाही. विशेष म्हणजे डॉ. सांगळे यांनी आतापर्यंत ६ कुलगुरूंच्या नियंत्रणाखाली काम केलेले आहे. सध्याचे कुलगुरू ७ वे आहेत. राजीनामा दिल्यांनतर कार्यमुक्त होण्याऐवजी चव्हाण व सांगळे हे दोघे अजूनपर्यंत आपली जबाबदारी सोडायला तयार नाहीत. परीक्षा विभागात विविध घोटाळ्यांची चौकशी करण्यासाठी प्राचार्य डॉ. दत्तात्रय आघाव यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली. तत्पूर्वी, परिषदेने परीक्षा विभागातील परीक्षा नियंत्रक डॉ. अशोक चव्हाण तसेच दोन उपकुलसचिव व लाँग स्टे झालेल्या कर्मचाऱ्यांचीही ताबडतोब बदली करण्याचा निर्णय झालेला आहे. असे असतानादेखील विद्यापीठ व्यवस्थापन समितीच्या निर्णयाला फारसे गांभीर्याने न घेता ‘वेट अँड वॉच’ अशी भूमिका घेत आहे.विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रक पदावर कॅप्टन डॉ. सुरेश गायकवाड यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.४कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी या पदासाठी सक्षम व्यक्तीचा अभ्यासपूर्वक शोध घेतला तेव्हा डॉ. सुरेश गायकवाड यांचे नाव अंतिम झाले आहे.
‘त्यांना’ खुर्चीचा मोह सुटेना
By admin | Updated: August 8, 2014 01:26 IST