जि.प. अध्यक्षांचे आदेश : बैठकीत घेतला कामांचा आढावा
औरंगाबाद : करोनामुळे गेल्या अकरा महिन्यांपासून अनेक योजना रखडल्या आहेत. आता कामात कुचराई न करता येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत सर्व नियोजित कामांच्या प्रशासकीय मान्यता करून घ्याव्यात, असे आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष मीना शेळके यांनी दिले.
मंगळवारी जिल्हा परिषद अध्यक्ष शेळके यांनी सर्व योजनांचा विभागप्रमुखांकडून आढावा घेतला. अध्यक्षांनी सकाळी साडेआठ वाजता बैठक बोलावून अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. दुपारी अधिकारी दौऱ्यावर असतात. त्यामुळे आढावा बैठक सकाळी घेण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कवडे यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
बैठकीत अध्यक्ष मीना शेळके यांनी सर्व विभागांच्या कामाचा आढावा घेतला. मंजूर कामे किती, त्यापैकी किती पूर्ण आणि अपूर्ण किती आहेत. अपूर्ण कामे कशामुळे असून, त्यातील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी किती कालावधी लागेल, आदी बाबी विचारण्यात आल्या. समाजकल्याण, कृषी, पशुसंवर्धन विभागांतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजना राबविल्या जातात. त्याची ग्रामीण भागात म्हणावी तेवढी माहिती होत नाही, त्यासाठी आगामी काळात व्यापक जनजागृती करून या योजना प्रभावीपणे राबवाव्यात, अशा सूचना शेळके यांनी केल्या. शाळा आणि अंगणवाड्यांची कामे प्राधान्याने करा, आरोग्य विभाग, बांधकाम विभागातील अपूर्ण कामांना गती द्या, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना बजावले.
आर्थिक वर्ष मावळण्यापूर्वी अर्थात नियोजित सर्व कामांना १५ फेब्रुवारीपर्यंत प्रशासकीय मान्यता घ्याव्यात, अशी सूचना शेळके यांनी केली.