उस्मानाबाद : मंजुरी मिळाल्यानंतर मोठ्या कालावधीनंतर शहरातील नवीन आनंदनगर पोलीस ठाण्याचे कामकाज चालू महिन्याच्या प्रारंभीपासून सुरू झाले आहे़ मात्र, दोन्ही ठाण्याच्या हद्दीतील शहरे, गावांची लोकसंख्या आणि कामकाजाचा वाढलेला ताण पाहता उपलब्ध कर्मचारीही अपुरे आहेत़ दोन्ही ठाण्यांमध्ये अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत़ परिणामी गुन्ह्यांच्या तपासासह इतर कामकाजाचा भार वाढल्याने अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण वाढताना दिसत आहे़जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या उस्मानाबाद शहरातील कायदा- सुव्यवस्था आजवर केवळ शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर होती़ मात्र, शहरासह हद्दीतील गावांची वाढलेली लोकसंख्या पाहता नवीन पोलीस ठाण्यांच्या मंजुरीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता़ नवीन पोलीस ठाण्याला मंजुरी मिळून अनेक महिने लोटली तरी इमारतीअभावी हे पोलीस ठाणे सुरू होण्यास उशिर झाला आहे़ उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बार्शी नाका ते सांजा रोडकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दक्षिणेकडील भाग व वडगाव सिद्धेश्वर हे गाव आहे़ तर वरील रस्त्याच्या उत्तर भागातील शहर व शिंगोली हे शहर नवीन आनंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे़उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यांतर्गत सध्या एक पोलीस निरीक्षक, दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक, दोन फौजदारांसह केवळ ६८ कर्मचारी कार्यरत आहेत़ तर आनंदनगर पोलीस ठाण्यासाठी अधिकाऱ्यांसह १२० कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत़ मात्र, इथे दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक, दोन पोलीस निरीक्षक आणि ७० पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत़ तर पोलीस निरीक्षकांसह कर्मचाऱ्यांची जवळपास ५० पदे रिक्त आहेत़ अशीच अवस्था शहर पोलीस ठाण्याचीही आहे़ उपलब्ध कर्मचारी पाहता विविध ठिकाणचे बंदोबस्त, ठाणे अंमलदार, संगणक, अधिकाऱ्यांचे रायटर, कोर्ट ड्युटी, प्रशिक्षण, डीवायएसपी कार्यालयाशी संलग्न, बीट अंमलदार, त्यांचे सहाय्यक अशा विविध कामास्तव हे कर्मचारी जाता़ तर काहीजण सातत्याने रजेवर असतात़ ही परिस्थिती पाहता ठाण्यात केवळ १० ते १२ कर्मचारी उपलब्ध राहत आहेत़ त्यातच एखाद्या मंत्र्याचा दौरा किंवा इतर कार्यक्रम असतील तरीही पोलिसांना बंदोबस्तकामी जावे लागते़ या बाबी पाहता अधिकारीच नव्हे तर कर्मचाऱ्यांवरीलही कामकाजाचा ताण वाढताना दिसत आहे़ विशेषत: अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे दाखल गुन्ह्यांचा तपास करण्यास पुरेसा वेळ संबंधित तपासाधिकाऱ्यांना मिळत नाही़ जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या उस्मानाबाद शहरातील दोन्ही पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याची आवश्यकता आहे़
ठाण्याचे विभाजन, मात्र कर्मचाऱ्यांची वाणवा कायम
By admin | Updated: March 21, 2016 00:17 IST