लातूर/निलंगा/देवणी : महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला १६ टक्के तर मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण जाहीर केले आहे. त्याच्या शैक्षणिक लाभासाठी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी या दोन्ही समाजाची तहसीलच्या सेतू सुविधा केंद्रात गर्दी सुरू झाली आहे. निलंगा व देवणी तहसील कार्यालयात प्रस्ताव दाखल केलेल्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वितरितही करण्यात आले आहे. तर लातुरात येत्या दोन दिवसांत प्रमाणपत्रांचे वितरण केले जाणार आहे. मराठा व मुस्लिम समाजाचे जात प्रमाणपत्र काढण्यासाठी तलाठ्याचा जातीचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, ग्रामसेवकाने दिलेल्या जातीचा दाखला, रेशनकार्ड किंवा आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, अर्जदाराचा प्रवेश निर्गम उतारा, मंडळ अधिकाऱ्यांचा पंचनामा किंवा वडिलांच्या जातीचा पुरावा व शपथपत्रांसह तहसील कार्यालयात प्रस्ताव दाखल करण्यात येत आहेत. लातूर तहसील कार्यालयात गेल्या दोन दिवसांत मराठा समाजातील ५० व मुस्लिम समाजातील ४ प्रस्ताव दाखल झाले आहेत. या प्रस्तावांची तहसील कार्यालयाच्या सेतू सुविधा केंद्रात छाननी सुरू आहे. छाननीअंती सर्व बाबींची तपासणी केल्यानंतर या लाभार्थ्यांना येत्या दोन दिवसांमध्ये प्रमाणपत्र दिले जाणार असल्याचे तहसीलदार महेश शेवाळे यांनी सांगितले. देवणी तहसील कार्यालयात तहसीलदार अहिल्या गाठाळ यांच्या हस्ते स्नेहा शिवाजी धनेगावे, पुरुषोत्तम भगवान सावंत व वैभव शंकर बिरादार यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार काळे यांच्यासह भगवान सावंत, नारायण धनेगावे, मधुकर सांगवे, नामदेव भोसले यांची उपस्थिती होती. तर निलंगा तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी ए.बी. मोहेकर, तहसीलदार एन.डी. टिळेकर यांच्या हस्ते सोनखेड येथील आशिष संजय धुमाळ, महेश धुमाळ, सूरज शिंदे, यशवंत जाधव, नितीन गोमसाळे, विशाल धुमाळ, बबलू जाधव, विशाल जाधव, किशोर बरमदे, शरद भाकडे, रोहिणी सोळंके यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. शासन निर्णयानुसार यंदाच्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना आरक्षणाचा लाभ मिळावा म्हणून प्रशासन प्रस्ताव दाखल करून घेत आहेत. जिल्ह्यातील दहाही तहसील कार्यालयांत ही प्रक्रिया सुरू झाली आहे. लातूर तहसील कार्यालयात दाखल झालेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने २५ जुलै रोजी जात प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येणार असल्याचे तहसीलदार महेश शेवाळे यांनी सांगितले.संबंधित विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी शपथ पत्रासोबत पुरावे जोडून प्रस्ताव दाखल करावेत, असे आवाहनही प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)५० प्रस्ताव दाखल...लातूर तहसील कार्यालयात मराठा समाजातील ५० प्रस्ताव दाखल झाले आहेत. प्रस्ताव दाखलकर्त्यांमध्ये मयुर काळदाते, रणजित काळे, किरण काळुंके, पवन पवार, शैलजा जाधव आदींचा समावेश आहे. तर मुस्लिम समाजाचे चार प्रस्ताव आहेत. त्यामध्ये जहिरोद्दीन सय्यद, मंजूर पठाण, नईम शेख यांनी प्रस्ताव दाखल केले आहेत. या सर्व प्रस्तावांसोबत दाखल केलेल्या कागदपत्रांची सत्यता पडताळण्यात येत आहे. पडताळणीअंती पुढील दोन दिवसांत प्रमाणपत्र दिले जाईल.
मराठा व मुस्लिम समाजाला प्रमाणपत्रांचे वितरण
By admin | Updated: July 24, 2014 00:10 IST