औरंगाबाद : मराठवाडा साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्र्यांनीच यावे, या संयोजन समितीच्या हट्टापायी संमेलन पुढे ढकलले जाते आहे. मात्र, आता विद्यमान मुख्यमंत्री उदगीरला आल्यास त्यांना पायउतार व्हावे लागते या अंधश्रद्धेपायी संमेलनच देवणीला घेण्याचे ठरत असल्याचे चित्रआहे. भाषा-साहित्यासह समाजमन समृद्ध करण्याचा हेतू समोर ठेवून मराठवाडा साहित्य संमेलन दरवर्षी भरवले जाते. मात्र, मूळ हेतूशी फारकत घेत या साहित्यिक मंचालाच अंधश्रद्धेची वाळवी लागल्याचे चित्र उभे राहते आहे. विद्यमान मुख्यमंत्री वा मंत्री उदगीरला आले तर त्यांना पद सोडावे लागते, अशी अंधश्रद्धा रूढ झालेली आहे. यासाठी दिवंगत मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, माजी मंत्री रमेश बागवे यांच्यासोबत झालेल्या घटनाक्रमाचे दाखले दिले जातात. ही वदंता माहीत झाल्यामुळेच मुख्यमंत्री या संमेलनासाठी तारीख द्यायला बिचकत असल्याचे बोलले जात आहे आणि याच बाबीचा फायदा घेत नुकतेच भाजपामध्ये दाखल झालेले देवणी येथील संस्थाचालक भगवानराव पाटील तळेगावकर यांच्या महाविद्यालयाची जागाही या संमेलनासाठी निश्चित करण्यात आली आहे. निलंग्याचे आमदार संभाजी पाटील यांनीही याला दुजोरा दिला आहे. उदगीर येथील स्वागताध्यक्ष रामचंद्र तिरुके यांनी मात्र ही बाब अमान्य केली असून, मुख्यमंत्री लवकरच तारीख देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मसाप संमेलनाला अंधश्रद्धेची बाधा?
By admin | Updated: December 27, 2014 00:47 IST