अजिंठा : स्मशानभूमीपर्यंत जाण्यासाठी नायब तहसीलदारांनी ग्रा.पं.च्या गावठाण जमिनीतून रस्ता दिल्याने संतापलेल्या ग्रा.पं. सदस्याने नायब तहसीलदारांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली व दस्तावेज हिसकावले. या प्रकरणी अजिंठा पोलिसांनी सरकारी कामात अडथळा निर्माण करणार्या ग्रा.पं. सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. सिल्लोड तालुक्यातील पानवडोद येथे गेल्या १५ वर्षांपासून स्मशानभूमीचा वाद सुरू आहे. तीन महिन्यांपूर्वी एका शेतकर्याने रस्त्यावर प्रेत अडविले होते. शेतातून प्रेत जाऊ देणार नाही, असा तो वाद होता. अजिंठा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शंकर शिंदे यांनी सांगितले की, एका धर्माच्या स्मशानभूमीला अडथळा न करता भूमी अभिलेख कार्यालयाकडून मोजणी करून ग्रा.पं.च्या गावठाण जागेतून वादावरून नायब तहसीलदार नंदू पंढरीनाथ पवार यांनी शनिवारी दुसर्या समाजाला ८ फुटांचा रस्ता दिला. यास गावकर्यांचा विरोध नव्हता. नायब तहसीलदार पवार ग्रा.पं. मध्ये बसले असता ग्रा.पं. सदस्य समाधान बंडू गायकवाड यांनी त्यांना शिवीगाळ केली. जिवे मारण्याची धमकी दिली व दोन समाजात तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य केले. नायब तहसीलदार पवार यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. (वार्ताहर) पोलीस-महसूल विभागाने मिटविला वाद स्मशानभूमीचा वाद अजिंठा पोलीस व महसूल विभागाने मिटविला आहे. आता गावात शांतता आहे, अशी माहिती सपोनि. शंकर शिंदे यांनी दिली. कायदा हातात घेऊन कुणी दोन समाजात तेढ निर्माण करू नये, नसता कठोर कारवाई करण्यात येईल किंवा गावातून हद्दपार करण्याचा प्रस्ताव पाठविला जाईल, असेही सपोनि. शंकर शिंदे यांनी सांगितले.
पानवडोद येथे स्मशानभूमीवरून वाद
By admin | Updated: June 3, 2014 01:09 IST