गंगापूर : श्रीक्षेत्र देवगड येथे मंगळवारी (दि.२९) दत्त जयंती सोहळा साजरा झाला. मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत ‘अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त... दत्तात्रय भगवान की जय’ असा जयघोष करीत आनंदमय वातावरणात दत्त जन्माचा सोहळा पार पडला. गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ८ वाजता ‘दिगंबरा... दिगंबरा... श्रीपाद वल्लभ... दिगंबरा’चा जयघोष करीत मंदिर प्रांगणात पालखी सोहळा काढण्यात आला. सजवलेल्या पालखी रथात श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या पादुका ठेवण्यात आल्या होत्या. कोरोना महामारी लवकरात लवकर जाऊ द्या, सारे विश्व सुखी होऊ द्या, असे साकडे दत्त जन्मप्रसंगी महंत भास्करगिरी महाराज यांनी भगवान दत्तात्रयांना घातले.
यावर्षी कोरोना महामारीचे संकट असल्याने श्रीक्षेत्र देवगड मंदिर प्रांगणात श्री गुरुदेव दत्त पीठाचे प्रमुख महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत जन्मोत्सव साजरा झाला. श्रीदत्त जन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी पहाटे वेदमंत्रांच्या जयघोषात भगवान दत्तात्रयांच्या मूर्तीची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर अभिषेक सोहळा पार पडला. त्यानंतर पाळण्याची दोरी ओढण्यात येऊन आरती करण्यात आली.
अग्रभागी भक्तिगीते गाणारे बँड पथक, सनई चौघडावादक, त्यामागे भागवत धर्माची पताका खांद्यावर घेत ‘दिगंबरा... दिगंबरा... श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ असा जयघोष करीत मोजकेच झेंडेकरी-वारकरी याप्रसंगी सहभागी झाले होते. यात्रा रद्दचा निर्णय आधीच करण्यात आलेला होता, तर दोन दिवसांपासून देवगडकडे येणारे सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. त्यामुळे प्रवरासंगम, देवगड फाटा, नेवासा येथून देवगडकडे जाणारे रस्ते ओस पडलेले दिसत होते.
फोटो :
श्रीक्षेत्र देवगड येथे श्रीदत्त जन्म सोहळ्याप्रसंगी पाळण्याची दोरी ओढताना गुरुवर्य भास्करगिरी महाराज. समवेत महंत सुनीलगिरी महाराज व ब्रह्मवृंद.