व्यंकटेश वैष्णव , बीडजिल्हा रुग्णालयाच्या संलग्नितच २०० खाटांना शासनाची मंजुरी आहे. मात्र, एका वर्षापासून शहरात जागा मिळत नसल्याने वाढीव खाटांना जागेची अडचण वर्षभरापासून कायम आहे. उपलब्ध ३१० खाटा अपुऱ्या पडत असून, रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत असल्याचे चित्र शनिवारी पाहवयास मिळाले.जिल्हा रुग्णालयात दररोज ५०० पेक्षा जास्त रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. खाटांची संख्या लक्षात घेता रुग्णांचा भार जास्त असल्याने अनेकवेळा रुग्णांना जमिनीवर झोपवून उपचार करण्याची वेळ डॉक्टरांवर येते. याला पर्याय म्हणून जिल्हा रुग्णालय प्रशासनाने एक वर्षापूर्वी वाढीव दोनशे खाटांचा प्रस्ताव राज्य शासनाकडे दाखल केला होता. येथील रुग्णांची संख्या लक्षात घेवून सादर केलेल्या प्रस्तावाला राज्य शासनाने मंजूरी देखील दिली. मात्र, शहरात रुग्णालयाला जागा पहाण्यात सहा महिन्यांचा वेळ वाया गेला. सहा महिन्यांपूर्वी जिल्हा रुग्णालयालगत असलेल्या पोलिसांच्या ताब्यातील जागा रुग्णालय प्रशासनाने मागितली. पुढे आरोग्यमंत्र्यांकडून जागेची पहाणी देखील करण्यात आली. मात्र, पाहणी करण्यापुढे हे प्रकरण पुढे जाऊ शकले नाही.जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे...जिल्हा रुग्णालयाच्या वाढीव २०० खाटांचा प्रश्न वर्षभरापासून जागेअभावी प्रलंबित आहे. जिल्हयातील नेत्यांचे देखील याकडे दुर्लक्ष होत आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी यामध्ये लक्ष दिले तर हा प्रश्न मार्गी लागेल असा सूर नागरिकांमधून उमटत आहे.सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी, कामगार, सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आले आहेत. यातच आरोग्यसेवा मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागते.
वाढीव खाटांना जागेची अडचण
By admin | Updated: March 27, 2016 00:04 IST