लातूर : महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला दोन वर्ष पूर्ण झाले, अद्यापही त्यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्यात सरकारला यश आले नाही. याच्या निषेधार्थ लातूर येथील जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंधश्रध्दा निर्मुलन समिती लातूर शाखेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी सामूहिकपणे निषेध नोंदवत डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणीही यावेळी निवेदनाव्दारे करण्यात आली.डॉ. दाभोलकर व कॉ. पानसरेंच्या हत्येच्या निषेधार्थ दर महिन्याच्या २० तारखेला आंदोलन करण्यात येते. दाभोलकर यांच्याप्रमाणेच कॉ. गोविंद पानसरे यांची हत्या करण्यात आली. मात्र या दोन्ही हत्या प्रकरणातील आरोपींचा अद्यापही शोध लावता आला नसून, याबाबत पोलिसांनी तपासात अक्षम्य दिरंगाई केल्याचा आरोप अंनिसने केला आहे. आता दाभोलकरांच्या हत्येला दोन वर्ष झाल्याच्या निषेधार्थ लातूर येथील जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने सामूहिक निषेध नोंदवत धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात राज्य प्रधान सचिव माधव बावगे, राज्य सरचिटणीस रामकुमार रायवाडीकर, बाबा हलकुडे, प्रकाश घादगिने, वैजनाथ कोरे, गणपतराव तेलंगे, प्राचार्य सोमनाथ रोडे, प्राचार्य डॉ. मधुकर मुंडे, प्रा. श्याम आगळे, मंगला बावगे, रघुनाथ नायर, चंद्रकांत भोजने, प्रा. दत्ता सोमवंशी, माधव होनराव, सुभाष सूर्यवंशी, श्रावणकुमार चिद्रे, अॅड़ डी. एन. भालेराव आदींसह अंनिसचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे लातुरात धरणे आंदोलन
By admin | Updated: August 21, 2015 00:42 IST