राजू दुतोंडे, सोयगावसोयगाव तालुक्यातील अंगणवाडी सेविका-मदतनिसांना गेल्या सहा महिन्यांपासून पगार नाही. आहार शिजवणाऱ्या बचत गटांना दहा महिन्यांपासून बिल मिळालेले नाही. चार महिन्यांपासून प्रकल्प अधिकारी नाही. पगाराअभावी आर्थिक विवंचनेत सापडलेल्या सेविका शिकविण्याच्या मन:स्थितीत नाहीत. खिचडी बंद होण्याची शक्यता आहे. संपूर्ण तालुक्यातील अंगणवाड्यांचा आणि बालविकास प्रकल्प कार्यालयाचा कारभार कोमात गेलेला आहे. सोयगाव तालुक्यात १४३ अंगणवाड्या व १४ मिनी अंगणवाड्या आहेत. यात १५७ अंगणवाडी सेविका व १४३ मदतनीस कार्यरत आहेत. पगार नसल्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झालेला आहे. सोयगाव बालविकास प्रकल्प कार्यालयात गेल्या चार महिन्यांपासून प्रकल्प अधिकारी नाही. प्रकल्प अधिकारी डी.टी. भिसे यांची बदली झाल्याचे कळते. त्यांच्या जागेवर अद्याप नियुक्ती झालेली आहे. प्रकल्प कार्यालयात पगारासाठी चकरा मारणाऱ्या अंगणवाडी सेविकांना कुणीच समाधानकारक उत्तर देत नसल्यामुळे संताप व्यक्त होत आहे.बालकांना आहार शिजविणाऱ्या बचत गटांची बिले सप्टेंबर २०१३ पासून मिळालेली नाहीत, त्यामुळे आहार बंद होण्याची शक्यता आहे. रिक्त पदांचा फटका, प्रभारी राज सुरूग्रामीण भागातील बालकाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी, मातांना बालकाच्या विकासाविषयी समुपदेशन करण्यासाठी, कुपोषण कमी करण्यासाठी महिला व बालविकास प्रकल्प हा विभाग आहे; परंतु अंगणवाड्याच्या व कार्यालयातील कार्यालय प्रमुखासह इतर रिक्त जागांमुळे सोयगाव तालुक्यातील बालकांचा विकास कोमात गेलेला आहे. विशेष म्हणजे सोयगाव पंचायत समितीत गटविकास अधिकारी पददेखील रिक्त आहे. प्रभारी गटविकास अधिकाऱ्यांचेही याकडे दुर्लक्ष आहे.
बालकांचा विकास कोमात
By admin | Updated: June 21, 2014 00:59 IST