औरंगाबाद : येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या जास्तीत जास्त जागा जिंकून आणण्याचा निर्धार येथील संत तुकोबाराय नाट्यगृहात आयोजित जिल्हास्तरीय कार्यकर्ता निर्धार मेळाव्यात करण्यात आला. या मेळाव्यास उपमुख्यमंत्री अजित पवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, जिल्ह्याचे संपर्क नेते तथा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे, राज्यमंत्री फौजिया खान, आ. सतीश चव्हाण, आ. संजय वाघचौरे, आ. चंद्रकांत दानवे, माजी खा. मौलाना उबेदउल्ला खान आझमी, विद्या चव्हाण, नीलेश राऊत, कदीर मौलाना आदींची उपस्थिती होती. विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य, स्फूर्ती व आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी पक्षाच्या वतीने राज्यात जिल्हानिहाय निर्धार मेळावे घेण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला आहे. या मेळाव्याचा प्रारंभ पालघर येथून करण्यात आला. सोमवारी औरंगाबादेत झालेल्या या मेळाव्यात जवळपास सर्वच नेत्यांनी आपल्या भाषणातून ‘निवडणुकीला सामोरे जाताना खचून न जाता मोठ्या हिमतीने, विश्वासाने सामोरे जा, सोशल मीडियाचा जास्तीत जास्त वापर करण्याचा प्रयत्न करा, गेल्या १० वर्षांत सरकारने राबविलेल्या विविध लोकोपयोगी योजनांची माहिती द्या. पारावर, ओट्यावर, सार्वजनिक चर्चा करताना नेहमी सकारात्मक चर्चा करा. लोकांना आत्मविश्वास द्या. पक्षाचा नेता, नीती, कार्यक्रम, कार्यकर्ता व संघटन या पंचसूत्रीबद्दल लोकांमध्ये जाऊन चर्चा करा, असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की विकासाचे मुद्दे घेऊन आपण जनतेसमोर जाऊ. लोकसभेची आता झालेली निवडणूक ही चमत्कारिक होती. मोदी सरकारने अल्पावधीत लोकांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.आपणास उद्याची निवडणूक महत्त्वाची आहे. पक्षाने दिलेले उमेदवार निवडून आणण्यासाठी आपल्यातील हेवेदावे बाजूला ठेवा. दिलेला उमेदवार कोण आहे, याचा विचार न करता तो पक्षाचा उमेदवार आहे. तो निवडून आलाच पाहिजे, यासाठी कामाला लागा, असा सल्ला पवार यांनी दिला.यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीतील बदललेले चित्र बघता कार्यकर्त्यांमध्ये हतबलता आली. कार्यकर्त्यांनी निराश न होता मोठ्या धैर्याने आतापासूनच विधानसभेत आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्यासाठी कामाला लागावे. संपर्क नेते राजेश टोपे म्हणाले की, पक्ष निश्चित करील त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी निर्धाराने कामाला लागावे. औरंगाबाद जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला विधानसभेच्या ३ जागा आहेत. आणखी २ जागा वाढवून दिल्या, तर त्या पाचही जागा आम्ही निवडून आणू. यावेळी राज्यमंत्री फौजिया खान व माजी खा. मौलाना उबेदउल्लाह खान, शहराध्यक्ष मुश्ताक अहमद व कार्याध्यक्ष विनोद पाटील यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हाध्यक्ष सुधाकर सोनवणे यांनी केले.प्रभावी प्रचार यंत्रणा राबवाअजित पवार यांनी भाषणात सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जास्तीत जास्त जागा निवडून येण्यासाठी योग्य व प्रभावी प्रचार यंत्रणा राबवा. पक्षाबद्दल विश्वासाचे वातावरण निर्माण करा. कार्यकर्त्यांना माणूस जोडण्याच्या बेरजेचे राजकारण करता आले नाही तरी चालेल; पण वजाबाकीचे राजकारण मात्र करू नका.
जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा निर्धार
By admin | Updated: July 15, 2014 01:01 IST