बदनापूर : येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील इंटरनेट सेवा विस्कळीत झाल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प झाले आहेत. या व्यवहारांकरिता अनेकांना हेलपाटे मारावे लागत आहेत.शासनाने खरेदी-विक्रीचे व्यवहार आता आॅनलाईन होणार असल्याचे जाहीर केले असले तरी यातील अनेक त्रुटींमुळे जनतेला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. बदनापूर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात तालुक्यातीलच नव्हे, तर अन्य जिल्ह्यांतून अनेकजण खरेदी-विक्रीचे दस्त नोंदणीकरिता येतात एका दस्तनोंदणीसाठी किमान पाच ते सहा जणांना यावे लागते. हे सर्व जण आपला वेळ व पैसा खर्चून येथे येतात. परंतु बदनापूर येथील या कार्यालयातील इंटरनेट सेवा गेल्या दोन दिवसांपासून बंद झाल्यामुळे दस्तनोंदणी ठप्प झाली आहे. यामुळे हा व्यवहार करणाऱ्यांना दिवसभर येथे बसण्याशिवाय पर्याय नसतो. तसेच पहिल्या दिवशी काम झाले नाही. तर दुसऱ्या दिवशीही त्याच कामासाठी यावे लागते. अशाप्रकारे लोकांचा या कार्यालयात दस्त नोंदणीसाठी वेळ व पैसा खर्च वाया जात आहे. बाँड विक्रेता व बाँड रायटर यांचाही यामुळे रोजगार बुडत आहे. बदनापुरातील अन्य इंटरनेट सेवा सुरू झाली. या कार्यालयातील ही सेवा मात्र ठप्प झाली आहे. याबाबत येथील दुय्यम निबंधक घाडगे म्हणाले, कार्यालयाचे कामकाज आॅनलाईन सुरू आहे. त्याकरिता इंटरनेट सुविधा आम्हाला मिळते. परंतु गेल्या दोन दिवसांपासून यामध्ये अडथळा आल्यामुळे इंटरनेट सुविधा बंद आहे. आम्ही संबंधितांना याबाबत कळविले आहे.
इंटरनेटअभावी व्यवहार झाले ठप्प
By admin | Updated: July 20, 2014 00:29 IST