अंबाजोगाई : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बंदच्या शिफारशीमुळे अंबाजोगाईकरांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. अधिकाऱ्यांच्या उदासीन भूमिकेमुळे कार्यालय सावरू शकले नाही, असा आरोप होऊ लागला आहे. आजतागायत एकही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अंबाजोगाईत राहिले नाहीत. लातूरमध्ये राहूनच कार्यालयीन कामकाज हाकण्यात त्यांनी धन्यता मानली. नोव्हेंबर २००४ मध्ये अंबाजोगाईत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कार्यान्वित झाले. एम. एच. ४४ हा क्रमांक या कार्यालयाला प्राप्त झाला. शंभर किलोमीटरचा पल्ला गाठून कामे करण्याची मोठी नामुष्की या परिसरातील वाहनधारकांना करावी लागायची. तो प्रश्न या कार्यालयामुळे मार्गी लागला. अंबाजोगाई, परळी, केज, माजलगाव, धारूर, वडवणी, अशा सहा तालुक्यांचा समावेश या कार्यालयाकडे झाला. बहुतांश अधिकाऱ्यांनी लातूरहूनच कार्यालयाचा कारभार हाकला. दोन लिपिक व दलालांच्या हाती सोपविला होता. अनेकदा तर कागदपत्रांचे गठ्ठे जमा करून कर्मचारी व दलाल लातूराहून सह्या घेऊन यायचे. दहा वर्षात प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने कारवाईसाठी कसलेही पथक स्थापन झाले नाही. अथवा कोणत्या वाहनावर कारवाईही झाली नाही. महसूल जमा करणे व गाडयांची पासिंग व लायसन्सचे वितरण एवढेच असल्याचे अंबाजोगाईकरांनी पाहिले. कार्यालयाला स्वत:ची इमारतही मिळाली नाही. दरम्यान या कार्यालयातून महिन्याकाठी ८०० ते ९०० वाहनांच्या नोंदी होत आहेत. असे असतानाही कार्यालय गुंडाळण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे अंबाजोगाईकरांची गैरसोय होणार आहे. शेजारच्या तालुक्यांनाही झळ बसेल. (वार्ताहर) महसूल कमी येणे, गुंडगिरी, दादागिरी, पासिंगसाठी येणाऱ्या वाहनांची संख्या कमी असणे, वाहनांचे अधिकृत विके्रते नाहीत, कार्यालय सुस्थितीत आणण्यासाठी १५ कोटींचा भुर्दंड अशी विविध कारणे दाखवून उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बंद करण्याचा घाट अधिकाऱ्यांच्या हेकेखोरपणामुळे सुरू आहे. ४हा डाव हाणून पाडून संघर्षातून मिळालेले हे कार्यालय सुरू राहिल. यासाठी पुन्हा संघर्ष करू अशी प्रतिक्रिया डॉ. द्वारकादास लोहिया यांनी लोकमतशी बोलतांना व्यक्त केली. ४जिल्हा निर्मितीसाठी असलेली आवश्यक कार्यालये अंबाजोगाईमध्ये आहेत. त्यात आरटीओचाही समावेश आहे. त्यामुळे हे कार्यालय कदापी बंद करू दिले जाणार नाही.
उदासिनतेमुळे आरटीओ कार्यालयाची दुरवस्था
By admin | Updated: March 16, 2015 00:52 IST