परभणी: विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या परभणी व जिंतूर मतदारसंघातील उमेदवारांनी आतापर्यंत झालेला खर्च निवडणूक विभागाकडे सादर केला असून सर्वाधिक खर्च करण्यात परभणीतून भाजपाचे उमेदवार आनंद भरोसे तर जिंतूरमधून राष्ट्रवादीचे उमेदवार विजय भांबळे असल्याचे समोर आले आहे.परभणी विधानसभा मतदारसंघातील २५ पैकी २२ उमेदवारांनी निवडणूक विभागाकडे खर्च सादर केला आहे. त्यामध्ये सवारधिक म्हणजे तीन लाख ८ हजार ९० रुपयांचा खर्च भाजपाचे उमेदवार आनंद भरोसे यांनी केल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर शिवसेनेचे उमेदवार राहुल पाटील यांनी १ लाख ५१ हजार ३५० रुपये खर्च केले असून मनसेचे उमेदवार विनोद दुधगावकर यांनी १ लाख २२ हजार ४८० रुपये आतापर्यंत खर्च केले आहेत. काँग्रेसचे उमेदवार इरफानूर रहेमान खान यांनी आतापर्यंत ८८ हजार ६५ रुपये खर्च केले असून एमआयएमचे उमेदवार सय्यद खालेद सय्यद साहेबजान यांनी ६० हजार ३८७ रुपये खर्च केले आहेत. अन्य उमेदवारांमध्ये बसपाचे डी.एस.कदम यांनी ३२ हजार १७४ रुपये, राष्ट्रवादीचे प्रताप देशमुख यांनी ४१ हजार ७०४ रुपये, एएनसीचे अशोक अंभुरे यांनी ५ हजार ४० रुपये, रिपाइं गवई गटाचे दिलीप खंदारे यांनी ५ हजार ३१० रुपये, सपाचे मन्सूर खान यासीन खान यांनी १० हजार १५० रुपये, बीएमपीचे शेख इब्राहीम शेख इस्माईल यांनी ११ हजार ५० रुपये खर्च केले आहेत. याशिवाय अन्य काही अपक्ष उमेदवारांनी खर्च सादर केला आहे.(प्रतिनिधी)