लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : लहान मुलांचे दुधाचे पडलेले दात, निखळलेले दात आणि दंतव्यंगोपचारात काढलेल्या दातांचा पुनर्वापर शक्य आहे. अशा दातांमधील मूलपेशींचा (टूथ स्टेम सेल) हृदय उपचारांत, प्लास्टिक सर्जरी आणि मणक्यांच्या शस्त्रक्रियेसह इतर उपचारांसाठी वापर होतो. त्यामुळे दातांचे योग्य पद्धतीने संकलन होणे आवश्यक असते. त्यादृष्टीने दंतपेढी उभारण्याचा संकल्प करण्यात आला असून, त्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आल्याचे शासकीय दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस.पी. डांगे यांनी सांगितले.दंत मूल पेशी पेढी ही संकल्पना सर्वात आधी २००५ मध्ये जपानमध्ये आली. तेथील हिरोशिमा विद्यापीठात ही पेढी सुरू झाली. त्यानंतर जपानमध्येच अन्य दोन ठिकाणी दंतपेढ्या स्थापन झाल्या. नॉर्वेमध्ये २००८ मध्ये स्थापन झालेल्या पेढीमध्ये एक लाख बालकांच्या दुधाच्या दातांतून काढलेल्या मूल पेशी ठेवण्यात आल्या आहेत.दंत मूल पेशींचे योग्यवेळी जतन आणि वापर करणे महत्त्वाचे ठरते. अपघातामुळे दात दुखावला गेल्यास, दात अधिक किडल्यास दंतपेढीतील स्टेम सेलचा वापर करता येतो. पडलेल्या दातांमधील मूलपेशीतील अॅडिपोसाइटस्चा वापर हृदयाच्या स्नायूंच्या उपचारासह अन्य उपचारांत यशस्वीरीत्या करता येतो, हे सिद्ध झाल्याचे डॉ. डांगे यांनी सांगितले. अल्झायमर, पार्किन्सन्ससारखे मेंदुविकार बरे करण्यात दुधाचे दात वापरले जाऊ शकतात. तसेच दातांना क्लिप लावण्याचे दंतव्यगोपचारासाठी काढलेल्या दातांचाही चांगल्या प्रकारे उपयोग होतो.निखळलेल्या दातांचे बारीक उभे भाग करून दातावर टोपी किंवा क्राऊन बसवायचा असेल, तर त्यास आधार देण्यासाठी वापर होतो, असेही त्यांनी सांगितले.
दंतपेढी उभारण्याचा ‘डेंटल’चा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 00:19 IST