औरंगाबाद : शहरामध्ये डेंग्यूसदृश आजाराने अक्षरश: थैमान घातले असून, सिडको- हडको, हर्सूल, जटवाडा, गारखेडा, एन-३ परिसरानंतर आता मुकुंदवाडी भागात साथरोगांनी विळखा घातला असून, या महिन्यात तेथे दोन मुले डेंग्यूने दगावली आहेत.मुकुंदवाडीतील पीयूष नावकर याचा डेंग्यूसदृश आजाराने बळी गेल्यानंतर आज ऋषिकेश भगवान ढवळे या १४ वर्षीय मुलाचा डेंग्यूसदृश तापाने बळी घेतला. १२ दिवस तापेशी झुंज दिल्यानंतर ऋषिकेशचे आज गजानन महाराज मंदिर परिसरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये निधन झाले. मुकुंदवाडी परिसरात रोगराईचे साम्राज्य पसरल्यामुळे साथरोगांचा फैलाव होत आहे. नाला, म्हशीचे गोठे, अस्वच्छता, अनधिकृत भंगारांच्या गोदामांमुळे तेथील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. गुणी विद्यार्थ्याचा अंतअभ्यासामध्ये ऋषिकेश हुशार होता. तो यंदा नववीला होता. ज्ञानज्योती प्रा.विद्यामंदिरमध्ये पहिलीपासून शिकायला होता. शाळेची आवड असलेला गुणी विद्यार्थी गेल्याचे सांगताना मुख्याध्यापिका अनिता शिंदे यांचे डोळे पाणावले. ऋषिकेशच्या निधनामुळे आज शाळा बंद ठेवण्यात आली होती. शाळेत फॉगिंग करण्यात आले. शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडत असल्यामुळे नागरिक चार ते पाच दिवस पाणी साठवून ठेवत आहेत. त्या पाण्यात डेंग्यूचे डास अंडी घालतात. तो डास चावल्यामुळे साथरोगांचा प्रसार होतो आहे. शिवाय नालेसफाई, कचरा संकलन, दूषित पाण्यामुळेही साथरोगांचे प्रमाण वाढले आहे. आरोग्य अधिकारी डॉ.संध्या टाकळीकर यांनी मुकुंदवाडीत फॉगिंग, अॅबेट वाटप मोहीम वेगाने घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
डेंग्यूने घेतला पुन्हा एक बळी
By admin | Updated: August 28, 2014 00:23 IST