औरंगाबाद : शहरात डेंग्यू, मलेरिया साथरोगांचे थैमान सुरूच असून महानगरपालिका करीत असलेल्या उपाययोजना कमी पडत असल्याचे दिसते. येथील खाजगी रुग्णालयात डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत.एडिस इजिप्त हा डास चावल्यानंतर डेंग्यूची साथ पसरते. हा डास स्वच्छ पाण्यावर अंडी घालत असल्यामुळे त्याची पैदासही झपाट्याने होते. त्यामुळे डेंग्यूची साथ आटोक्यात आणण्यासाठी पाणी जास्त दिवस साठवून ठेवू नका, आठवड्यातून एक दिवस संपूर्ण पाणी वापरून भांडी कोरडी करून ठेवा, असे सार्वजनिक आरोग्य विभाग सांगतो. असे असले तरी पावसाळा सुरू झाल्यापासून ठिकठिकाणी पाणी साचलेले असते. त्यामुळे डासांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने डेंग्यूची साथ आटोक्यात आणण्यात महानगरपालिकेला अद्याप यश आलेले नाही. शहरातील सर्वच भागांत डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. गारखेडा परिसरातील पुंडलिकनगर, विजयनगर, गुरुदत्तनगर, भारतनगर येथे डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. मुकुंदवाडी, रामनगर, संघर्षनगर येथेही डेंग्यूचे रुग्ण आढळत असल्याचे महानगरपालिकेच्या सूत्रांनी सांगितले. याशिवाय सिडको, हडको, एन-११, मयूरनगर, मयूर पार्क, नवा मोंढा, जाधववाडी या ठिकाणी डेंग्यूसोबतच मलेरियाचे रुग्ण आढळत आहेत. जळगाव रोडवरील साई मेडिसिटी रुग्णालयाचे डॉ. विशाल ढाकरे यांनी याविषयी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. विशेषत: हडको, एन-११, मयूरनगर, मयूर पार्क या परिसरातील रुग्णांची संख्या अधिक आहे. याबाबत आम्ही महानगरपालिकेच्या आरोग्य विभागास वेळोवेळी कळविले आहे. एका नगरसेवकाला डेंग्यू झाल्याने ते सध्या आमच्याकडे उपचार घेत असल्याचे ढाकरे म्हणाले. सहकार खात्यात उच्च पदावर कार्यरत असलेले एक अधिकारी गारखेडा परिसरात राहतात. त्यांच्या दोन्ही मुलांना डेंग्यू झाल्याने त्यांना रुग्णालयात अॅडमिट केल्याचे त्या अधिकाऱ्यांनी सांगितले. घाटीत दहा रुग्णांवर उपचारघाटीत डेंग्यूची लागण झालेले दहा रुग्ण वेगवेगळ्या वॉर्डात उपचार घेत आहेत. रुग्णामध्ये डेंग्यूची लक्षणे आढळल्यानंतर त्याच्यावर तातडीने उपचार सुरू केले जातात. त्यानंतर त्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी वरिष्ठ प्रयोगशाळेकडे पाठविण्यात येतात. रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत पोहोचण्यास उशीर झाल्यास डेंग्यूचे जंतू मरण पावतात. परिणामी, त्या रुग्णास डेंग्यू नसल्याचा अहवाल येतो. रक्तातील प्लेटलेट होतात कमीडेंग्यूमुळे रुग्णास ताप येतो-जातो. रुग्ण बरेच दिवस दवाखान्यात जाण्यास टाळाटाळ करतो किंवा मेडिकल स्टोअरवरून ताप कमी होण्याच्या गोळ्या खातो. परिणामी, आजार बळावतो. जेव्हा तो मोठ्या रुग्णालयात दाखल होतो, त्यावेळी त्याच्या रक्ताची तपासणी करण्यात येते. तेव्हा रक्तातील पांढऱ्या पेशी कमी झालेल्या दिसतात. त्यास अशक्तपणा येतो. लक्षणे आणि प्रयोगशाळेच्या अहवालानंतर रुग्णास डेंग्यू असल्याचे निदान पक्के होते. प्रकृती अधिक ढासळली तर रुग्णास प्लेटलेट देण्याचे सांगितले जाते. डेंग्यूची साथ वाढल्यापासून शहरातील रक्तपेढ्यांमध्ये प्लेटलेटची मागणी वाढल्याचे सूत्रांनी सांगितले.
डेंग्यू, मलेरियाचे शहरात थैमान
By admin | Updated: July 21, 2014 00:35 IST