औरंगाबाद : देशभरात सर्वत्र स्वच्छता मोहीम राबविली जात असताना जिल्हाधिकारी कार्यालयात मात्र पोस्टर्स आणि बॅनर्सच्या माध्यमातून विद्रुपीकरण सुरू आहे. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे कार्यालयाच्या भिंतीवर ठिकठिकाणी सर्रासपणे पोस्टर्स, बॅनर्स लावले जात आहेत. अगदी हॉटेलची जाहिरात करणारे फलकही येथील भिंतीवर झळकत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर १५ आॅगस्टपासून देशभरात स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालयही यामध्ये मागे नाही. परिसरातील कचरा आणि घाण उचलून अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत आपला सहभाग नोंदविला; पण दुसरीकडे कार्यालयाच्या इमारती मात्र पोस्टर्स आणि बॅनर्सनी अस्वच्छ झाल्या आहेत. जिल्ह्याचे प्रमुख सत्ताकेंद्र असलेल्या या कार्यालयाच्या भिंतींवर राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि चित्रपटांचे पोस्टर्स चिकटवण्यात आलेले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वार, सेतू सुविधा केंद्र, सातबारा वाटपाच्या खिडक्या आणि परिसरात बंद अवस्थेत उभ्या असलेल्या गाड्यांवरही असे पोस्टर्स चिकटविलेले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाप्रमाणेच या परिसरात असलेल्या इतर कार्यालयांचीही अवस्था अशीच आहे. जलसंधारण महामंडळाचे प्रवेशद्वार, इमारतीचे पिलर्स, तहसील कार्यालय, उपविभागीय कार्यालय येथेही सर्रासपणे पोस्टर्स आणि बॅनर्स चिकटविण्यात आले आहेत. पोस्टरबाजांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील जनरेटही सोडलेले नाही.
जिल्हाधिकारी कार्यालयाचे विद्रुपीकरण
By admin | Updated: December 18, 2014 00:41 IST