बीड: जिल्ह्यात मार्च दरम्यान झालेल्या गारपिटीतील नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची तयारी शासनाने दाखवली़ मात्र शासन निकषामुळे निम्म्यापेक्षा जास्त शेतकर्यांना मदतीपासून वंचित रहावे लागले आहे़ एवढेच काय तर एकट्या पाटोदा तालुक्यातून दोन हजार शेतकर्यांनी निवेदनाद्वारे दुबार पंचनामे करण्याची मागणी केली आहे. गारपिटीत चाळीस टक्के नुकसान झाले काय? अन् पन्नास टक्के झाले काय? शेवटी आमच्या तोंडचा घास हिरावला गेला आहे, अशा प्रतिक्रिया गारपीटग्रस्त शेतकर्यांमधून येत आहेत. एकट्या पाटोदा तालुक्यातून दुबार पंचनाम्यासाठी दोन हजार अर्ज आले आहेत़ राज्यासह बीड जिल्ह्यात मार्च दरम्यान झालेल्या गारपिटीसह वादळ वार्यांमुळे शेतकर्यांच्या रबी पिकांचे मोठे नुकसान झाल्याने जिल्ह्यातील शेतकर्यांनी आत्महत्या केल्यात. ज्या शेतकर्यांच्या पिकांचे पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेले आहे, त्यांनाच दोन हेक्टरपर्यंतच्या नुकसानीचा मोबदला मिळणार आहे. या शासन धोरणामुळे शेतकरी उध्द्वस्त झाला आहे. एकट्या पाटोदा तालुक्यातून शनिवारपर्यंत दोन हजार शेतकर्यांनी तहसिल कार्यालयाला निवेदन देऊन गारपिटीत झालेल्या नुकसानीचे दुबार पंचनामे करावेत, अशी मागणी केली आहे. पंचनाम्यांची तपासणी करणार जिल्ह्यातील शेतकर्यांनी दुबार पंचनाम्याची मागणी केलेली आहे. यावरून सर्वप्रथम तलाठ्यांनी केलेल्या पंचनाम्यांची तपासणी करण्यात येईल. याबरोबरच मी नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन पहाणी करणार आहे. शेतकर्यांनी केलेल्या मागणीवर तोडगा काढण्यात येईल असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले. निकष चुकीचेच आस्मानी संकटांमुळे शेतकर्यांच्या तोंडाचा घास हिरावला गेला आहे. गारपीटीत जरी चाळीस टक्के नुकसान झालेले असले तरी काळ्या पडलेल्या ज्वारी अथवा गव्हाला कोण घेणार? असा सवाल बीड तालुक्यातील हिंगणी बु. येथील सरपंच अंकुश गोरे यांनी उपस्थित केला आहे. (वार्ताहर)
गारपीटग्रस्त शेतकर्यांकडून दुबार पंचनाम्याची मागणी
By admin | Updated: May 10, 2014 23:51 IST