औरंगाबाद : लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून तलाठी सज्जांची संख्या मात्र वाढलेली नाही. नागपूरचे विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्या समितीने तलाठी सज्जे वाढविण्याची शिफारस करूनदेखील त्याची अंमलबजावणी होत नसल्याने कराड येथे होणाऱ्या तलाठी संघाच्या अधिवेशनात तलाठी सज्जे वाढविण्याची मागणी करणार असल्याची माहिती तलाठी संघाचे कार्याध्यक्ष सतीश तुपे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. तलाठी संघाचे १८ वे राज्यस्तरीय अधिवेशन १६ व १७ जानेवारी रोजी कराड येथे होत आहे. या अधिवेशनात राज्य तलाठी संघाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत तलाठी सज्जा वाढविण्याची मागणी केली जाणार आहे. सरकारने तलाठी सज्जा वाढविण्यासाठी नागपूरचे विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. या समितीने राज्य सरकारकडे अहवाल सादर केला असून २०१४ च्या हिवाळी अधिवेशनात महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी राज्यात ३ हजार ३२ तलाठी सज्जे वाढविण्याची घोषणा केली होती; परंतु अद्यापही याबद्दल निर्णय घेण्यात आलेला नाही. सध्या राज्यात १२ हजार ६३७ तलाठी सज्जे आहेत. राज्य सरकारने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना संघटनेचे पदाधिकारी राहता येणार नसल्याचे परिपत्रक काढण्यात आल्याने तलाठी संघाच्या अधिवेशनात नव्याने पाच वर्षांसाठी राज्य कार्यकारिणी निवडली जाणार असल्याचे कार्याध्यक्ष सतीश तुपे यांनी सांगितले.
३ हजार ३२ तलाठी सज्जे वाढविण्याचा निर्णय रखडला
By admin | Updated: January 15, 2016 00:11 IST