येरमाळा : बस अपघातात गंभीर जखमी झालेले जिल्हा परिषदेचे सदस्य नानासाहेब जाधवर (रा़रत्नापूर ताक़ळंब) यांचे रविवारी सोलापूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले़ यामुळे चोराखळी येथे झालेल्या अपघातातील मृतांची संख्या आता पाचवर गेली आहे. जाधवर यांच्या पार्थिवावर रत्नापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले़कळंब तालुक्यातील चोराखळी पाटीनजीक ९ जानेवारी रोजी सकाळी ट्रकने बसला जोराची धडक दिल्याने चौघांचा मृत्यू झाला होता़ तर सहा जणांची प्रकृती गंभीर झाली होती़ गंभीर जखमीमध्ये जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा बँकेचे संचालक नानासाहेब जाधवर यांचाही समावेश होता़ अपघातात जाधवर यांच्या कपाळावर, नाकाला जबर मार लागला होता़ गंभीर जखमी जाधवर यांना जिल्हा रुग्णालयातून तातडीने सोलापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते़ तेथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती़ मात्र, रक्तदाब कमी झाल्याने व शरीरातील पेशींचे प्रमाण कमी झाल्याने उपचारादरम्यान रविवारी सकाळी जाधवर यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितल्याची माहिती रमेश जाधवर यांनी दिली़ निधनानंतर नानासाहेब जाधवर यांचे पार्थिव रविवारी दुपारी त्यांच्या मूळ गावी रत्नापूर येथे आणण्यात आले होते़ त्यांच्या शेतात पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले़ यावेळी आ़ राणाजगजितसिंह पाटील, आ़ राहूल मोटे, राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष जीवन गोरे, जिल्हा परिषद अध्यक्ष अॅड. धीरज पाटील, उपाध्यक्ष सुधाकर गुंड, संजय पाटील दुधगावकर, जिल्हा परिषद सदस्या कांचनमाला संगवे, पंचायत समिती सदस्य प्रविण यादव, माजी सभापती विकास बारकूल यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी, अधिकाऱ्यांसह ग्रामस्थ, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते़ त्यांच्या निधनामुळे रत्नापूर व परिसरावर शोककळा पसरली आहे़ (वार्ताहर)
नानासाहेब जाधवर यांचा उपचारादरम्यान मृत्यू
By admin | Updated: January 19, 2015 00:56 IST