लातूर : अंबाजोगाई रोडवर पेट्रोल भरण्यासाठी दुचाकीवर गेलेले संस्कृतचे पंडित रिव्हर्स येणाऱ्या टिप्परच्या धडकेत जागीच ठार झाले़ पोलिसांनी टिप्पर चालकास अटक केली आहे़ सिताराम नगरातील संस्कृतचे पंडित आचार्य धम्मदीप रामस्वरुप लोखंडे (वय ६२) हे शनिवारी सकाळी ८़१५ वाजण्याच्या सुमारास अंबाजोगाई रोडवरील उड्डान पुलाजवळील एका पेट्रोल पंपावर गेले होते़ पेट्रोल पंपासमोर ते उभे असताना रिव्हर्स येणारा टिप्पर (क्ऱ एमएच ०४, एच ९१६०) त्यांच्या अंगावरुन गेल्याने ते गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले़ त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सायंकाळी मारवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले़ त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून, दोन विवाहित मुली, जावाई, नातवंडे, दोन भाऊ, चार बहिणी असा परिवार आहे़ डॉ़ चंद्रशेखर लोखंडे यांचे ते कनिष्ठ बंधू होत़ धम्मदीप लोखंडे यांनी आर्य समाजाच्या माध्यमातून सामाजिक कार्य केलेले आहे़ गुरुकुलमधून शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी लातूरमध्ये हजारो विद्यार्थ्यांना संस्कृतचे शिक्षण दिले आहे़ दरम्यान पोलिसांनी टिप्पर चालक भगवान गणपती कांबळे यास अटक केली आहे़ (प्रतिनिधी)
टिप्परच्या धडकेत लोखंडे यांचा मृत्यू
By admin | Updated: April 12, 2015 00:53 IST