शिरूर अनंतपाळ : खरीप हंगामातील पिकांना पावसाचा ताण सहन होऊन जोमदार पीक येण्यासाठी कृषी कार्यालयातर्फे पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे़ पेरणी करताना मृत सरी तयार करून पेरणी केली तर त्या सरीमध्ये वीस टक्के पाणीसाठा धारण करण्याची क्षमता असते़, असे प्रात्यक्षिक दाखविण्यात येत आहे़ त्यामुळे मृत सरी अवर्षणावर 'मात' करी असा अनुभव पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना येत आहे़खरीप हंगामात प्रत्येक वर्षी जुलै-आॅगस्ट महिन्यात पाऊस मोठा ताण देतो़ त्यामुळे पेरणी नंतर उगवलेली कोवळी पिके कोमेजून जात आहेत़ त्यामुळे उत्पादनावरसुध्दा मोठा परिणाम होत आहे़ यासाठी तालुका कृषी कार्यालयाचे कृषी अधिकारी डी़बी़सुतार, अनंत गायकवाड यांनी चालू वर्षातील खरीप हंगामापूर्वी मृत सरीद्वारे पेरणी करण्याचा पथदर्शी उपक्रम सुरू केला असून, ठराविक अंतरावर मृत सरी काढून पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा होत आहे़ शिवाय या सरीमध्ये वीस टक्के जादा पाणीसाठा साठवून ठेवण्याची क्षमता असते़ त्यामुळे पावसाने ताण दिल्यानंतर त्याचा कोवळ्या पिकांना मोठा फायदा होतो़अशी सोडावी सरी़़़चार ओळी पेरणी केल्यानंतर एक पूर्ण ओळ रिकामी सोडावी़ या रिकाम्या (मृत) सरीत इतर जमीनी पेक्षा २० टक्के पाणीसाठा धारण करण्याची क्षमता असते़ जेव्हा-केव्हा पाऊस लांबतो किंवा मोठा ताण देतो तेव्हा रिकाम्या (मृत) सरीतील साठलेल्या पाण्याचा कोवळ्या पिकांसाठी उपयोग होतो़ परिणामी, पावसाने ताण देऊनसुध्दा पिके जीवंत राहतात़या मृत सरीचा पावसाने ताण दिल्यानंतर तर फायदा होतोच त्याचबरोबर पाऊस जादा झाला तरीसुध्दा अधिकचे पाणी ओसरून पाण्याचा निचरा होण्यासाठीसुध्दा मृतसरी उपयुक्त ठरतात़ एकंदर या तंत्राचा दुहेरी फायदा होतो़ त्यामुळे मृत सरी अवर्षणावर 'मात' करी असे तालुक्यातील शेतकऱ्यांना वाटत आहे़
मृत सरी अवर्षणावर 'मात' करी़़़़
By admin | Updated: July 7, 2014 00:12 IST