औरंगाबाद : आपणास मुलगा नाही याची आयुष्यात त्यांनी कधीच खंत बाळगली नाही. आपल्या दोन मुलींना त्यांनी मुलाप्रमाणे वागणूक दिली. मुलींनीही त्यांच्या अंतिम इच्छेनुसार वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. मुलीने वडिलांच्या मृतदेहाला अग्नी देऊन नवीन पायंडा पडला, याचा अभिमानही प्रत्येकजण व्यक्त करीत होता.
विवेकानंदपुरम येथील रघुनाथ साधले (वय ८६) यांचे सोमवारी (दि. १) निधन झाले. ते ब्रुक बॉंड कंपनीतून अधिकारी पदावरून निवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चेत पत्नी व नीता महाजन, मानसी भागवत या विवाहित मुली आहेत. उतारवयात मुली, त्यांचे जावई मकरंद महाजन व विक्रम भागवत यांनी त्यांचा सांभाळ केला. रघुनाथ साधले यांची अंतिम इच्छा होती की, मुलींनी माझ्या पार्थिवावर अंतिम संस्कार करावेत. त्यानुसार नीता महाजन यांनी प्रतापनगरमधील स्मशानभूमीत वडिलांच्या मृतदेहाला अग्नी दिला. एवढेच नव्हे तर पुढील सर्व विधी स्वतः करणार असल्याचेही यांनी सांगितले.