लातूर : डेंग्यू आणि डेंग्यूसदृश आजाराने जिल्ह्यात थैमान घातले आहे़़ त्यामुळे उपचारासाठी खाजगीबरोबरच सरकारी दवाखान्यात गर्दी होत आहे़ परंतु, गेंड्याच्या कातडीची सरकारी यंत्रणा हलायचे नाव घेत नाही. कारण हिवताप अधिकाऱ्यांच्या दप्तरी जिल्ह्यात दोन महिन्यांत डेंग्यू झालेल्या रुग्णांचा आकडा शून्य आहे. अगदी परवा दिवशी डेंग्यूने मृत्यू झालेल्या अक्षता बालाजी अलगुले हिची सुद्धा डेंग्यू झाल्याची नोंद जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्याधिकारी वा मनपा आरोग्य अधिकाऱ्यांकडे नाही. खाजगी रुग्णालयात दाखल होऊन निदान झालेल्या नोंदी शासकीय यंत्रणा स्वीकारायला तयार नाही. खाजगीचे जाऊ द्या; परंतु, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात डेंग्यूमुळे दाखल झालेल्या व निदान झालेल्या रुग्णांची नोंदही आरोग्य विभागाकडे नाही. आरोग्य उपसंचालक कार्यालय असलेल्या लातूरमधील उदासिनतेचे हे विदारक दृश्य आहे.जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालात सप्टेंबर आणि आॅक्टोबर या दोन महिन्यांत शहरी भागातील डेंग्यू रुग्णांची संख्या निरंक असल्याचे कळविले आहे. या दोन महिन्यांच्या कालावधीत खुद्द शासकीय सर्वोपचार रुग्णालयात डेंग्यूचे ११ रुग्ण आढळल्याची नोंद आहे. एका शासकीय रुग्णालयात ११ रुग्ण असताना हिवताप अधिकाऱ्याचा अहवाल निरंक कसा, असा प्रश्न आहे. शिवाय, खाजगी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची शासकीय तपासणी केंद्रात रक्त तपासणी करण्याची कोणतीही यंत्रणा आरोग्य विभागाकडून राबविली जात नाही. ४खाजगी रुग्णालयातील रुग्णांचा अहवाल जिल्हा हिवताप अधिकारी गृहित धरीत नाहीत. त्यामुळे या नोंदी शासकीय दप्तरी होत नाहीत. हे होण्यासाठी कोणतेही ठोस पाऊल आरोग्य विभाग उचलत नाही. ४आजमितीला जिल्ह्यातील मोठ्या रुग्णालयांची संख्या ३० हून अधिक आहे. प्रत्येक रुग्णालयात चौकशी केली, तर डेंग्यूचे दहापेक्षा जास्त रुग्ण दाखल झाल्याची नोंद सर्रास आढळते. डेंग्यूसदृश आजाराचा हाच आकडा तीनशेच्या पुढे जातो. केवळ सरकारी ताळमेळ नसल्याने याच्या नोंदी होत नाहीत की, या नोंदी नोंदवून आरोग्य खात्याचे काम वाढेल या भीतीने त्या मुद्दामहून घेतल्या जात नाहीत. याबाबत संशय असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहेत. त्यामुळे संबंधित जिल्हा प्रशासनाने दखल घेऊन शहर व परिसरातील भागांमध्ये फवारणी करावी, अशी मागणी होत आहे.शहरात मोठ्या प्रमाणात सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी, डोकेदुखीचे रुग्ण आढळून येत आहेत़ शहरातील विविध खाजगी तसेच शासकीय रुग्णालयात साथरोगाने पीडित असंख्य रुग्ण उपचार घेत आहेत़ तर डेंग्यूचे ११ रुग्ण उपचार घेत होते़ तर डेंग्यू संशयित म्हणून १९ जण सध्या उपचार घेत आहेत़ रविवारी एका ९ वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे़ जिल्ह्यात अनेक गावात तापीचे रुग्ण वाढले आहेत़ जानेवारी ते आॅक्टोबर या महिन्यात जिल्ह्यात ९०१ घरे दूषित आढळून आले़ तसेच १२६७ दूषित कन्टेनर आढळून आले़ त्यापैकी ६७ कन्टेनर रिकामे करण्यात आले़ यात तांदुळजा, जानवळ, वडवळ, साकोळ, दैठणा यांचा समावेश आहे़ या साथरोग गावातील एकूण ७१ तापाचे रुग्ण आले होते़ त्यापैकी २४ रुग्णांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी पाठवले असता, ११ रक्तजल नमुने डेंग्यू दूषित आढळून आले़ भादा, अलमतांडा, खरोळा, हाकेतांडा, नळेगाव, बनसावरगाव येथे ४३ घरे दूषित आढळून आले़ या साथग्रस्त गावातील एकूण ७५ रुग्ण आढळून आले़ त्यापैकी २१ जणांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी पाठविले़ ११ रक्तजल नमुने चिकुनगुनिया दूषित आढळून आले़ तर लातूर शहरातील लक्ष्मी कॉलनी, वाढवणा, गाझीपुरा, वाढवण्यातील एका रुग्णाचा साथ रोगाने मृत्यूही झाला आहे़ तर लातूर शहरातील लक्ष्मी कॉलनी व गाझीपुरा भागातील एक-एक असे दोन रुग्णांचा साथ रोगाने मृत्यू झाला आहे़ लातूर शहरी व ग्रामीण भागातील आतापर्यंत २१६ डेंग्यू संशयितांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी पाठविले होते़ त्यात शहरातील २० व ग्रामीण भागातील ३५ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याने ५५ रुग्ण आढळून आले़ तर चिकुनगुनियाचे १६ रुग्ण आढळून आले़ तर ७१ रुग्ण डेंग्यू व १६ चिकुनगुनियाचे असे ७१ रुग्ण असल्याचे जिल्हा हिवताप विभागाच्या वतीने सांगण्यात येत आहे़ याशिवाय जिल्ह्यात विविध खाजगी व प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच शहरातील खाजगी आणि शासकीय रुग्णालयात असंख्य रुग्ण उपचार घेत आहेत़ पण जिल्हा हिवताप कार्यालयाच्या वतीने नांदेड येथील प्रयोगशाळेच्या अहवालानुसार ज्या रुग्णाचे रक्तजल नमुने दूषित आहेत, तेच ग्राह्य मानले जातात़ अन्य प्रयोगशाळेचे रिर्पोट्स डेंग्यू पॉझिटिव्ह असले तरी ते ग्राह्य मानले जात नाहीत़ (प्रतिनिधी)
डेंग्यूचा कहर... अधिकाऱ्यांना नाही खबर..!
By admin | Updated: November 6, 2014 01:35 IST