केज : तालुक्यातील बनकरंजा येथे बुधवारी सरपंच निवडीनंतर माजी सरपंच अरूणा दहीरे व त्यांचे पती श्रीमंत अंबादास दहीरे या दाम्पत्यास मारहाण केल्याची घटना घडली. यावेळी बंदोबस्तासाठी युसूफवडगाव ठाण्याचे पोलीस होते. त्यांच्यादेखत हा प्रकार घडला.बनकरंजा ग्रा.पं.मध्ये अरूणा दहीरे या राखीव जागेतून निवडून आल्या. त्यानंतर त्यांच्याकडे सरपंचपद आले. मात्र, त्यांच्याविरूद्ध अविश्वास ठराव पारित झाला. त्यामुळे त्यांना सरपंच पदावरून पायउतार व्हावे लागले. बुधवारी नवीन सरपंच पदाची निवड प्रक्रिया पोलीस बंदोबस्तात ग्रा.पं. कार्यालयात झाली. निवडीनंतर दहीरे यांनी सरपंच निवडीबाबत अधिकाऱ्यांकडे लेखी मागितले. त्यानंतर दहीरे दांपत्यास मारहाण झाली. पोलीस असतानाही मारहाण झाली हे विशेष. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. (वार्ताहर)
बनकरंज्यात दांपत्यास मारहाण
By admin | Updated: June 23, 2016 01:16 IST