विकास राऊत, औरंगाबाद जायकवाडीचे पाणी दूषित होण्याचे प्रमाण मागील १० वर्षांच्या तुलनेत दुपटीने वाढले आहे. शहरातील ६६ कि़ मी. नाल्यातून वाहणारे सुमारे ९० एमएलडी पाणी एसटीपीतून शुद्ध न होताच नाथसागराला मिळत असल्यामुळे जलप्रदूषण वाढले आहे. मनपाच्या ४६४ कोटी रुपयांच्या भूमिगत गटार योजनेत ६ एसटीपी प्रस्तावित आहेत. योजनेचे काम या महिन्यात सुरू झाल्यास एसटीपी होण्यास ३ वर्षे लागतील. तोपर्यंत शहरातील नाल्यांचे पाणी जायकवाडीला जाऊन मिळणारच आहे. तोवर जायकवाडीतील जलप्रदूषण वाढेल. शहरात सध्या दोन एसटीपी आहेत. त्याचा जायकवाडीशी संबंध नाही. शहरातून दररोज ७० ते ९० एमएलडी पाणी नाल्यातून वाहते. तेच पाणी ब्रह्मगव्हाणमार्गे जायकवाडीत येऊन मिळते. डाव्या कालव्याच्या बाजूने उतार असल्यामुळे पालिकेच्या उपसा केंद्रातून दूषित पाणी फारोळ्याकडे येते. ब्रह्मगव्हाण येथे एमआयडीसीचे उपसा केंद्र होते. त्यांनी ते केंद्र पुढे सरकवले आहे. त्यामुळे शहरातील नाल्याचे पाणी थेट जायकवाडीत येत आहे. एसटीपीतून फिल्टर होऊन ते पाणी जायकवाडीत येणे क्रमप्राप्त आहे. मनपाचे अभियंते म्हणतात १ किलो लिटर प्रती एमएलडी क्लोरिनचे प्रमाण सध्या पाण्यात टाकण्यात येत आहे. मध्यंतरी पाण्यात अळ्या व इतर कीटकांचे प्रमाण वाढलेले दिसून आले होते. जायकवाडीतून येणारे पाणी दूषित असल्यामुळे कीटकांचा प्रादुर्भाव वाढतो. मध्यंतरी शुद्धीकरण केंद्रात कीटक वाढले होते. रसायनांचा वापर वाढविल्यानंतर कीटक नष्ट झाले, असे उपअभियंता के. एम. फालक यांनी सांगितले. जलप्रदूषण वाढल्यामुळे शुद्धीकरणाचा खर्च २० लाखांहून १ कोटी रुपयांपर्यंत गेला आहे. प्रदूषणामुळे कीटकांचे प्रमाण वाढल्यास खर्च वाढतो. तुरटी, ब्लिचिंग पावडर, क्लोरिन टाकून फारोळा येथे जायकवाडीतून येणारे पाणी शुद्ध करून नक्षत्रवाडी संतुलन टाकीतून शहराकडे येते. शुद्धीकरण खर्च १ कोटी फारोळा येथे जायकवाडीतून येणार्या पाण्याचे टीडीएस (टोटल डिझॉल्व्ह सॉलिड) २५० पर्यंत असते. क्लोरिन व इतर रसायनांचा मारा करून ते पाण्याचे टीडीएस २०० ते १७५ पर्यंत आणले जाते. जलगुणवत्ता प्रयोगशाळेच्या अहवालानुसार रसायनांचे प्रमाण ठरते.
दररोज ९० एमएलडी दूषित पाणी जायकवाडीत
By admin | Updated: June 5, 2014 01:10 IST