परतूर : वाईट हेतूने आठ वर्षीय बालिकेस पळवून नेणाऱ्या पंचवीस वर्षीय तरुणास पोलिसांनी अटक केली आहे. या बालिकेस परतुर ते पारडगाव पायी व तेथून रेल्वेने जालना येथे नेले होते. मात्र मुलीच्या नातेवाईकांनी मुलीस रेल्वेस्थानकावर ओळखल्याने पुढील अनर्थ टळला. परतूर शहरातील पारधीवाडा येथून आरोपी शेख अजिमोद्दीन शेख ताजोद्दीन (रा. पारधीवाडा परतूर, वय २५ वर्षे) याने दि. १३ एप्रिल रोजी एका आठ वर्षीय बालिकेस वाईट हेतूने हात धरून पळवून नेले. आरोपीने सदर मुलीस परतूर ते पारडगाव पायी नेले व तेथून रेल्वेने जालना येथे नेले. परंतु मुलींच्या नातेवाईकास अचानक ही मुलगी सदरील आरोपीसोबत दिसली. या नातेवाईकांनी रेल्वे पोलिसांच्या मदतीने या बालिकेस परतूर पोलिसांच्या स्वाधीन केले. नातेवाईकांनी मुलीस पाहिल्याने पुढील अनर्थ टळला. या आरोपीस परतूर पोलिसांनी १५ रोजी अटक केली आहे. याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. (वार्ताहर)परतूर: बावीस वर्षीय महिला आपल्या घरी बसली असता एका आरोपीने पाणी पिण्याचा बहाणा करून सदर महिलेचा हात धरून विनयभंग केला. याप्रकरणी परतूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप आरोपीस अटक झाली नसल्याचे सांगण्यात आले. परतूर शहरातील आरोपी अझहर नासेरोद्दीन काजी (रा.काजी गल्ली परतूर) याने दि. १२ रोजी सकाळी दहाच्या सुमारास सदर बावीस वर्षिय महिला आपल्या घरात मुलाबाळासह बसली असता हा तेथे आला व पाणी पिण्याच्या बहाण्याने सदर महिलेचा विनयभंग केला. सदर महिलेने आरडाओरड केली असता पतीसह नातेवाईक तेथे जमा झाले असता आरोपी पळून गेला. या प्रकरणी परतूर पोलिसात आरोपीविरूधद गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप आरोपीस अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगीतले. याप्रकरणी अधिक तपास पोउनि एम. बी. शेख हे करीत आहेत.
बालिकेस पळविणारा ताब्यात
By admin | Updated: April 16, 2015 00:57 IST