उस्मानाबाद : शहरातील हजरत ख्वॉजा शमशोद्दीन उरूसानिमित्त भरलेल्या उरूसातील विविध साहित्याच्या खरेदीसाठी महिलांसह युवतींची मोठी गर्दी होत आहे़ दर्गाह परिसरात लावण्यात आलेले मोठे पाळणे, लहान पाळण्यात घिरट्या घेण्यासह विविध खेळण्यांच्या खरेदीसाठी बच्चेकंपनीचीही मोठी गर्दी होत आहे़ हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या हजरत ख्वॉजा शमशोद्दीन गाझी यांच्या उरूसास १३ मे रोजी उत्साहात प्रारंभ झाला आहे़ उरूसानिमित्त सेहरा मिरवणूक, गुसल पाणी मिरवणूक, संदल मुबारक मिरवणूक, एस़़टी़, आॅटोरिक्षा संघटनांची संदल मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली़ तर दर्गाह परिसरात बांगड्या, कपडे, पर्स, सौंदर्य प्रसाधनाच्या वस्तूंसह गृहोपयोगी वस्तू खरेदी करण्यासाठी महिलांसह युवतींची मोठी गर्दी होत आहे़ तर या परिसरात दोन मोठ्या पाळण्यांसह फिरते पाळणे, रेल्वे, छोटे पाळणे, घसरगुंडीसह इतर विविध खेळण्या लावण्यात आल्या आहेत़ तर विविध खेळण्यांसह साहित्य खरेदीसाठी बालकांनी पालकांकडे लावलेला अट्टाहास आणि त्या वस्तू खरेदी केल्यानंतर बालकांच्या चेहर्यावरील आनंदाचे क्षण येथे दिसून येत होते़ विविध पाळण्यांसह खेळण्यांची मजा लूटण्यासाठी युवकांसह लहान मुलांची गर्दी होत आहे़ महिलांनाही या खेळण्या-पाळण्यांनी आकर्षित केल्याचे दिसत आहे़ शुक्रवारी रात्री कव्वालीसह चिरागाचा तर शनिवारी रात्री ज्यारत व कव्वाली कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला़ यावेळी उस्मानाबादसह परिसरातील भाविकांची लक्षणीय उपस्थिती होती़ भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी उरूस कमिटीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या असून, सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे़ (प्रतिनिधी) चोख बंदोबस्त उरुसानिमित्त येणार्या भाविकांना कसलाही त्रास होवू नये, विशेषत: महिलांची छेडछाड रोखण्यासाठी दर्गाह मैदान परिसरात पोलिस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. उरूसातील हालचालींवर नजर ठेवण्यासाठी अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेर्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच भाविकांना वाहतुकीचा त्रास होवू नये, यासाठी वाहतूक मार्गातही बदल करण्यात आला आहे.
दर्गाह परिसरात भाविकांची अलोट गर्दी
By admin | Updated: May 18, 2014 00:50 IST