सिल्लोड : तालुक्यात आठ दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने खरिपाची उगवलेली पिके कोमेजू लागली असून, शेतकरी हवालदिल झाला आहे. तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे.यंदा पावसाचे दीड महिना उशिरा आगमन होऊनही अद्यापपर्यंत तालुक्यात दमदार पाऊस झालेला नाही. तालुक्यात मध्यम व हलक्या स्वरूपाच्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी केली. कपाशी, मका, सोयाबीन, बाजरी आदी पिके उगवत असताना आठ-दहा दिवसांपूर्वी तालुक्यात सलग दोन दिवस रिमझिम पाऊस झाला. यामुळे उगवणी होत असलेल्या पिकांसाठी रिमझिम पाऊस फलदायी ठरला. रिमझिम पावसामुळे पिके चांगली उगवली; परंतु गेल्या आठ-दहा दिवसांपासून तालुक्यात पावसाने उघडीप दिल्याने उगवलेली पिके कोमेजू लागली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे असून बळीराजा दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. पावसाळा सुरू दोन महिने झाले तरी अद्यापपर्यंत दमदार पाऊस झाला नसल्याने जलसाठे कोरडेच असून विहिरींना पाणी नाही. तालुक्यात काही गावांमध्ये मे महिन्यापासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. तालुक्यातील २२ गावांना ३३ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी दमदार पावसाची गरज आहे. सलग तीन वर्षांपासून वरुणराजाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडलेले आहे. रबीची पिके ऐन सोंगणीत असताना तालुक्यात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. हातातोंडाशी आलेला घास गारपिटीमुळे हिरावला गेला. यंदा पावसाचे दीड महिना उशिरा आगमन झाले. त्यामुळे यंदाही शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडण्याची चिन्हे आहेत.
पिके कोमेजू लागली; पाणीटंचाई ‘जैसे थे’
By admin | Updated: August 4, 2014 01:57 IST