जालना : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १५ जूनपूर्वीच शंभर टक्के पीक कर्ज वाटप करण्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी आदेश दिल्यानंतरही विविध बँकांनी अद्यापपर्यंत केवळ ३३ टक्के शेतकऱ्यांनाच पीक कर्ज वाटप केले आहे. एकीकडे वरूणराजा रूसला असून दुसरीकडे विविध बँकांकडून शेतकऱ्यांची अडवणूक होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.जिल्ह्यातील विविध राष्ट्रीयीकृत व सहकारी बँकांमधून शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज वितरण होणे आवश्यक आहे. मात्र बँकांकडून ही प्रक्रिया अत्यंत संथगतीने होत आहे. २० जूनपर्यंत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सहकारी बँकेतर्फे १५५ कोटी ५८ लाख, खाजगी बँक १५ कोटी ४६ लाख, ग्रामीण बँकेने ६५ कोटी ४० लाख, जिल्हा सहकारी बँकेने २८ कोटी ९२ लाख रूपये असे एकूण २६६ कोटी ३६ लाख रूपये पीक कर्जाचे वाटप केले आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ ने वारंवार वृत्त प्रकाशित केले. त्यामुळे बँक अधिकाऱ्यांसह प्रशासनात मोठी खळबळ उडाली. विशेषत: जिल्ह्याधिकारी नायक यांनी दखल घेत बँकाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. कर्ज वितरणाचे काम अत्यंत संथगतीने चालू असल्याबद्दल त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करून बँकाच्या अधिकाऱ्यांना उद्दिष्ट लवकर पूर्ण करण्यासाठी सूचना केल्या होत्या. पालकमंत्री टोपे यांनीदेखील ‘लोकमत’ च्या वृत्ताची दखल घेत त्यासाठी विशेष बैठक घेतली होती.जिल्ह्यातील सुमारे साडेपाच लाख शेतकऱ्यांपैकी फक्त १ लाख ८४ खातेदारांनाच पीक कर्जाचे वाटप केले जाते. परंतु नवीन शेतकऱ्यांची पीक कर्जासाठी अडवणूक केली जाते. नव्याने पीक कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना सर्व बँकानी पीक कर्ज देता येईल, अशा सूचना पालकमंत्री टोपे यांनी दिल्या होत्या. यावर्षी जिल्ह्यात पीक कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण केले होते. यावर्षी पीक कर्जाचे उद्दिष्ट २४ टक्क्यांनी वाढवून ते ७९७ कोटी रूपयांचे करण्यात आले आहे. गतवर्षी जिल्ह्याने पीक कर्ज वाटपात अग्रक्रम पटकावला होता.यंदा मात्र पाऊसच नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पाऊस पडण्याची शेतकरीवर्ग वाट पाहत आहे आणि बी बियाणांच्या खरेदीसाठी बँकेचे खेटे मारत असून अद्यापही ३३ टक्के पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. पाऊस नसल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची आर्थिक बाजू कमकुवत झाली आहे. शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी कर्ज लवकर वाटप करावे, अशी आशा शेतकरीवर्गातून होत आहे. जेणेकरून शेतकरी पुन्हा नव्या दमाने पेरणीसाठी सज्ज होईल. (प्रतिनिधी)मान्सूनचा पाऊस जिल्ह्यात अजूनही काही ठिकाणी झालेला नाही. त्यामुळे शेतकरी पावसाबरोबरच बँकेकडून मिळणाऱ्या पीक कर्जाच्या प्रतीक्षेत आहेत. पावसाअगोदर कर्जाची रक्कम हाती पडेल, अशी शेतकऱ्यांना आशा होती. मात्र बहुतांश शेतकऱ्यांना अद्यापही कर्ज मिळालेले नाही. त्यामुळे कर्जाची रक्कम तातडीने हाती द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. पावसासाठी शेतकरी आकाशाकडे डोळे लावून आहेत.
जिल्ह्यात पीक कर्ज वाटप कासवगतीनेच
By admin | Updated: July 7, 2014 00:19 IST