बीड : जिल्ह्यात यावर्षी दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने पीक विमा भरण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. आतापर्यंत तब्बल तीन लाख शेतकऱ्यांनी तीस कोटींहून अधिक रक्कमेचा पीक विमा भरला आहे. गेल्या दोन ते तीन वर्षात बीड जिल्ह्याला दुष्काळ, अवकाळी पाऊस तर कधी गारपीट यांनी तडाखा दिलेला आहे. गेल्या फेबु्रवारी व मार्च महिन्यात हातातोंडाशी आलेली गहू, हरभरा, ज्वारी आदी पिके गारपीटीत जमिनदोस्त झाली. यामुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले. यासह फळबागा व भाजीपाला पिकांचेही मोठे नुकसान झाले. या आपत्तीत तब्बल एक लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. यामुळे कोट्यवधी रुपयांची शेतकऱ्यांनी हानी झाली. जिल्ह्यात अशा नैसर्गिक आपत्ती वारंवार येत आहेत. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. अनेकदा शासनाकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदतही दिली जाते. मात्र, ही मदत शेतकऱ्यांना पुरेशी ठरत नाही. अशा परिस्थितीत मदत मिळावी, यासाठी शेतकरी आता पीक विमा मोठ्या प्रमाणावर भरू लागले आहेत. गेल्ह्यात गेल्यावर्षीही १ लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता. त्यामुळे त्यांना शंभर कोटींपेक्षा अधिक रक्कम मिळाली होती. यावर्षीही पावसाळा सुरू होऊन पेरणीनंतर पाऊसाने ओढ दिली आहे. त्यामुळे पिके धोक्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचा पीक विमा भरण्याचा कल वाढला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत साडेसहा लाख हेक्टवर पेरणी झाली आहे. यामध्ये तीन लाखांपेक्षा अधिक क्षेत्रावर कपाशीची लागवड आहे. यासाठी शेतकऱ्यांनी मोठा खर्च केला आहे. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती आल्यास आर्थिक मदत मिळावी यासाठी दोन लाख ८९ हजार ६१० शेतकऱ्यांनी आतापर्यंत पीक विमा भरला आहे. यापोटी ३० कोटी ६० लाख ९५ हजार ६९२ रुपयांचा भरणा केला असल्याची माहिती अग्रणी बॅँकेचे व्यवस्थापक बोकाडे यांनी दिली. जिल्ह्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या शाखांत पीक विमा भरला आहे. पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांची बॅँकांमध्ये गर्दी होत असल्याने पीक विमा भरण्याची तारीखही प्रशासनाने १६ आॅगस्टपर्यंत वाढविली आहे. (प्रतिनिधी)
शेतकऱ्यांनी भरला तीस कोटींचा पीक विमा
By admin | Updated: August 3, 2014 01:16 IST