लातूर : पावसाळ्याचे दोन महिने उलटत आले तरी वरुणराजाने अद्याप पोषक हजेरी लावली नाही. तुटपुंज्या पावसावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपून घेतल्या आहेत. शनिवारपर्यंत जवळपास ८९.४ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली. परंतु, पाऊसच नसल्याने पहिल्या व दुसऱ्या टप्प्यांत पेरणी झालेली पिके आता कोमेजू लागली आहेत. शिवाय, वाढ खुंटल्याने आजच्या परिस्थितीनुसार उत्पादनात २० टक्के घट होण्याची भीती शेतकऱ्यांनी वर्तविली आहे.जून व जुलै महिन्यात सरासरीपेक्षाच नव्हे तर अगदी गतवर्षीच्याही तुलनेत अत्यंत तोकडा पाऊस यंदा झाला आहे. जिल्ह्यात जून महिन्यामध्ये सरासरी १४५ मि.मी. पाऊस होतो. परंतु, यंदा केवळ ४७.०७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. ऐन पेरणीच्या हंगामातच पाऊस कमी झाल्याने पेरण्या लांबल्या. दरम्यान, जुलै महिन्यात दोन टप्प्यांमध्ये पेरणीयोग्य पाऊस पडला. जुलै महिन्याची सरासरी १६७ मि.मी. इतकी आहे. तुलनेत २७ जुलैपर्यंत १०७.८ मि.मी. पावसाची नोंद कृषी विभागाच्या अहवालानुसार झाली आहे. या तीन टप्प्यांत झालेल्या पावसामुळे पेरण्याही तीन टप्प्यांतच पार पडल्या. शनिवारपर्यंत जवळपास ८९.४ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यात सर्वसाधारण पेरणीयोग्य क्षेत्र ५ लाख ५६ हजार ८६० हेक्टर्स आहे. त्यापैकी यंदा ४ लाख ९७ हजार ९१८ हेक्टर्स क्षेत्रावर पेरणी झाली. त्यात सर्वाधिक क्षेत्र सोयाबीनचे आहे. यंदा तब्बल ३ लाख ३७ हजार १९८ हेक्टर्स क्षेत्रावर सोयाबीन पेरलेले आहे. त्यापाठोपाठ ९१ हजार ३ हेक्टर्स क्षेत्रावर तुरीची लागवड करण्यात आली आहे. ३७ हजार ७११ हेक्टर्स क्षेत्रावर ज्वारीची तर मूग ९३७९, उडीद ६८४८, मका ५२५५ हेक्टर्स क्षेत्रावर पेरला गेला आहे. भुईमूग १५३३, बाजरी १०७९ हेक्टर्स क्षेत्रावर तर कापसाची लागवड १६३२ हेक्टर्स क्षेत्रावर करण्यात आली आहे.पेरणी पूर्णत्वाकडे आली असली, तरी जिल्ह्यात अद्याप पावसाची पाठच असल्याने पिके आता कोमेजू लागली आहेत. जूनच्या पहिल्या टप्प्यात झालेल्या पावसानंतर पेरणी झालेल्या क्षेत्रावरील पिकांची वाढ मोठ्या प्रमाणात खुंटली आहे. जूनच्या अखेरीस व जुलैच्या सुरुवातीस झालेल्या पावसानंतर पेरणी झालेल्या पिकांची अवस्थाही कोमेजल्यासारखी बनली आहे. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त होत आहे.सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रात मोठी वाढ...पर्जन्यमान कमी होत चालल्याने वर्षागणिक सोयाबीनची पेरणी झपाट्याने वाढू लागली आहे. कृषी विभागाच्या सांख्यिकीनुसार जिल्ह्यातील सोयाबीनचे सरासरी पेरणीक्षेत्र १ लाख ९२ हजार हेक्टर्स आहे. परंतु, दोन वर्षांत यात भरमसाठ वाढ झाली आहे. गतवर्षी ३ लाख ३५ हजार ३६० हेक्टर्स क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी करण्यात आली होती. यंदा ३ लाख ३७ हजार १९८ हेक्टर्स क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे.शेतकरी अडकले विवंचनेत...पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात पेरणी झालेल्या पिकांची वाढ खुंटली आहे. शिवाय, अधूनमधून उन्हाचा कडाका सुरू असल्याने पिके आता कोमेजू लागली आहेत. आजघडीला पिकांची जी परिस्थिती आहे, त्यानुसार उत्पादनात २० टक्के घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे. दरम्यान, सध्या बहुतेक शेतकऱ्यांनी दुंडे धरले आहेत. परंतु, दुंड्यामुळे ओलसर माती उघडी होऊन जमिनीतील ओलावा कमी होत चालला आहे. त्यामुळे पिकांची परिस्थिती आणखीनच बिकट बनण्याची भीती आहे. दुंडे न मारल्यास तण वाढून उत्पादन घटण्याची भीती असल्याने सध्या विवंचनेत असल्याचे शेतकरी गंगाधर गरिबे, अमर सुरवसे, बालाजी हाडोळे म्हणाले.
पिकांची वाढ खुंटली
By admin | Updated: July 28, 2014 00:56 IST