नांदेड :शहरातील गांधी पुतळा भागात आयएमईआय क्रमांक बदलणाऱ्या एका मोबाईल विक्रेत्याच्या दुकानावर छापा मारुन स्थानिक गुन्हे शाखेने मोबाईल व इतर साहित्य जप्त केले होते़ या प्रकरणात लोकमतने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर तब्बल २४ दिवसानंतर स्थानिक गुन्हे शाखेने गुन्हा नोंदविला आहे़ नांदेड शहरासह जिल्ह्यात दररोज मोबाईल चोरीच्या अनेक घटना घडत आहेत़ ज्यांच्याकडे मोबाईल खरेदीची पक्की बिले आहेत किंवा ज्यांना त्याच क्रमांकाचे सीमकार्ड हवे असते असेच नागरीक चोरीबाबत पोलिसांत तक्रार नोंदवितात़ या तक्रारींची पोलिसांकडून मात्र फारशी दखल घेतली जात नाही़ त्यात असे मोबाईल डिटेक्ट करण्यासाठी त्या मोबाईलचा आयएमईआय क्रमांक महत्वाचा असतो़ त्यावरुनच अनेक गुन्हे उघडकीस आल्याच्या घटनाही घडल्या आहेत़ परंतु नांदेडात मोबाईल चोरट्यांनी व्यवस्थितपणे साखळी तयार केली आहे़ त्यामुळे एकदा चोरीला गेलेला मोबाईल सापडल्यास तो अपवादच ठरतो़ यापूर्वी नांदेडात मोबाईल चोरीस गेल्यानंतर ते हैद्राबाद येथे पाठविण्यात येत होते़ या ठिकाणी आयएमईआय क्रमांक बदलण्यात येत होता़ परंतु आता मात्र आयएमईआय क्रमांक बदलणारी मोठी टोळीच नांदेडात सक्रिय असल्याचे उघडकीस आले आहे़ याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळाल्यानंतर गांधी पुतळा भागातील संतोष इलेक्ट्रॉनिक्स या दुकानावर १४ मार्च रोजी छापा मारण्यात आला़ यावेळी दुकानातून संगणक, १४१ मोबाईल, मदरबोर्ड जप्त करण्यात आले़ या ठिकाणी बेकायदेशीररित्या मोबाईल हँन्डसेटचे आयएमईआय क्रमांक बदलण्यात येत असल्याचे निदर्शनास आले़ त्यानंतर हे सर्व साहित्य सायबर विभागाकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले़ या प्रकरणात सायबर सेलने ४ एप्रिल रोजी अहवाल दिला असल्याचे स्थागुशाचे म्हणणे आहे़ त्यानुसार ६ एप्रिल रोजी शिवाजी डोईफोडे यांनी सरकारतर्फे दिलेल्या तक्रारीवरुन वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ या प्रकरणाचा तपास पोलिस निरिक्षक अनिल गायकवाड हे करीत आहेत़ दरम्यान, गत २४ दिवसांपासून या प्रकरणाचा तपास सुरु होता़ लोकमतने सातत्याने या प्रकरणाचा पाठपुरावा केला होता़ आता या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर आयएमईआय क्रमांक बदलणारे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे़
आयएमईआय क्रमांक प्रकरणात अखेर गुन्हा
By admin | Updated: April 8, 2016 00:04 IST