येणेगूर : मुरूम येथील आडत व्यापारी भीमराव वरनाळे यांच्यावरील प्राणघातक हल्लाप्रकरणी चौघा अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना गुरूवारी पहाटेच्या सुमारास घडली होती़ याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, मुरूम येथील आडत व्यापारी तथा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बसवराज वरनाळे यांचे बंधू भीमराव वरनाळे हे गुरूवारी पहाटे वॉकिंगसठी गेले होते़ वॉकिंगहून परतत असताना एका महाविद्यालयाजवळ त्यांच्यावर अचानक हल्ला झाला़ या घटनेत गंभीर जखमी झालेल्या भीमराव वरनाळे यांच्यावर मुरूम येथे प्रथमोपचार करून सोलापूर येथील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते़ मुरूम पोलीस ठाण्याचे पोउपनि एम़टी़ कांबळे, पोना शिवलिंग घोळसगाव यांनी सोलापूर येथील रूग्णालयात जावून वरनाळे यांचा जबाब नोंदविला आहे़ वॉकिंगहून परतताना वरनाळे यांच्यावर चार अज्ञातांनी अचानक हल्ला केला़ यातील एकाने कत्तीने तर इतरांनी काठीने मारहाण केल्याचा जबाब वरनाळे यांनी दिला आहे़ वरनाळे यांच्या जबाबावरून अज्ञात हल्लेखोरांविरूध्द मुरूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास सपोनि विलास गोबाडे हे करीत आहेत़ दरम्यान, भिमराव वरनाळे यांची प्रकृती सुधारत असल्याचे त्यांचे बंधू बसवराज वरनाळे, चिरंजीव अमृत वरनाळे यांनी सांगितले़ (वार्ताहर)
हल्लाप्रकरणी चौघांविरूद्ध गुन्हा
By admin | Updated: March 15, 2015 00:37 IST