औरंगाबाद : अरुण बोर्डेंविरुद्ध गुन्हा का दाखल केला तसेच त्यांना अटक करू नये म्हणून क्रांतीचौक पोलीस ठाण्यासमोर लोक जमवून घोषणाबाजी करणे आणि पोलिसांवर दबाव आणला म्हणून गफ्फार कादरीसह ‘एमआयएम’च्या २५० ते ३०० कार्यकर्त्यांविरुद्ध क्रांतीचौक ठाण्यात गुरुवारी (दि.५) गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना ३ मे रोजी रात्री ८.३० ते १२ वाजेदरम्यान घडली. गफ्फार कादरी, रफिक चित्ता, फेरोज खान, प्रदीप बोर्डे, सचिन बोर्डे, सविता बोर्डे, शकुंतला शरीन, कुणाल खरात, अनिल वाहूळ आणि जमावातील इतर २५० ते ३०० लोकांचा आरोपींमध्ये समावेश आहे. याबाबत क्रांतीचौक पोलिसांनी सांगितले की, तीन वर्षांपूर्वी स्थानबद्धतेच्या कारवाईवेळी करावा लागलेल्या दहा लाखांच्या खर्चासह हॉटेलचालक संतोष जाधव यांच्याकडे महिन्याला तीस हजारांची खंडणी मागितल्याप्रकरणी ‘एमआयएम’ नगरसेविकेचे पती अरुण बोर्डे यांच्याविरुद्ध क्रांतीचौक ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखेने अरुण बोर्डे यांना ताब्यात घेतले होते. बोर्डे यांना क्रांतीचौक ठाण्यात नेल्यावर एमआयएमच्या गफ्फार कादरीसह ३०० लोकांच्या जमावाने घोषणाबाजी करून पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. हवालदार गोरखनाथ कडू यांच्या फिर्यादीवरून जमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
गफ्फार कादरीसह जमावाविरुद्ध गुन्हा
By admin | Updated: May 6, 2016 23:56 IST