संतोष धारासूरकर, जालनासंपूर्ण राज्यात मोसंबीच्या उत्पादनात आघाडीवर राहिलेल्या या जिल्ह्यात यावर्षी पडलेल्या अल्पशा पावसामुळे मृग नक्षत्रात फुटणारा मोसंबीचा मृग बहर पूर्णत: धोक्यात आला आहे. या जिल्ह्यात फळबागांचे लागवड क्षेत्र मोठे आहे. विशेषत: मोसंबीचे क्षेत्र लक्षणीय आहे. संपूर्ण राज्यात हा जिल्हा मोसंबी उत्पादनात आघाडीवर आहे. परंतु गेल्या दोन-तीन वर्षांपासून या जिल्ह्यातील मोसंबी उत्पादकांना नैसर्गिक अपत्तीचा मोठा तडाखा बसतो आहे. दोन वर्षांपूर्वी या जिल्ह्यात पडलेल्या अभूतपूर्व दुष्काळामुळे मोसंबी उत्पादकांना मोठा तडाखा बसला. जवळपास साठ ते सत्तर टक्के बागा पाण्याअभावी जळाल्या. मोठ्या बागायतदारांनी प्रचंड कसरती व खर्च करीत बागा वाचविल्या. परंतु अपेक्षेएवढे उत्पादन पदरात पडले नाही. गेल्यावर्षी पाऊस उत्तम झाला. फेब्रुवारी मार्च या महिन्यात गारपिटीने मोठा तडाखा दिला. परिणामी फळ बागांचे अतोनात नुकसान झाले. लागोपाठ दोन वर्षे आपत्ती कोसळल्याने फळ उत्पादक पूर्णत: कोलमडला. या पार्श्वभूमीवर सलग तिसरे वर्षी या फळ उत्पादकांना अपुऱ्या पावसामुळे तडाखा बसणार आहे. घनसावंगी, अंबड, बदनापूर या तीन तालुक्यात फळबागांचे क्षेत्र मोठे आहे. परंतु अपुऱ्या पावसाअभावी मृग नक्षत्रात फुटणारा मोसंबीचा मृग बहर जुलै अखेरपर्यंत फुटलाच नाही, असे दुर्दैवी चित्र समोर आले आहे. घनसावंगी तालुक्यात ३ हजार ७९ हेक्टर क्षेत्र मोसंबीचे असून, अंबड तालुक्यात ३१९.३० हेक्टर केवळ मोसंबीचे आहे. या फळबागांना मृग बहर न फुटल्यानेच फळ उत्पादक हबकून गेले आहेत. या फळबाग उत्पादकांवर मृग बहर धोक्यात आल्याने मोठ्या आर्थिक संकटास सामना करावा लागणार हे निश्चित आहे. फळबागांना अंब्या बहर आला आहे. पोळ्यापर्यंत अंब्या बहरातील मोसंबी बाजारपेठेत दाखल होते. परंतु या मोसंबीस फेब्रुवारी मार्च मधील गारपिटीचा तडाखा बसलेला आहे. त्यामुळे अंबे बहरातील मोसंबीचे कितपत उत्पादन पदरात पडेल याविषयीच शंकाच आहे. यावर्षी पोळ्याचा सण फळउत्पादकांना दिलासा देईल अशी चिन्हे आहेत. मृग नक्षत्रात पाऊस बरसेल व मृग बहर फुटेल या अपेक्षेने फळ उत्पादकांनी पाण्याचे नियोजन केले. विहिरी व कूपनलिकांतील पाण्याचा पुरेपूर उपयोग केला. दुर्दैवाने आता पाणीसाठे पूर्णत: आटले आहेत. त्यामुळे मोसंबी जगवावी कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मोसंबीचा मृग बहर धोक्यात
By admin | Updated: July 31, 2014 00:46 IST