सिल्लोड : पहिल्या टप्प्यात सिल्लोड तालुक्यातील १ हजार ७८५ शासकीय व खासगी हेल्थ वर्करांना कोविडची लस देण्यात येणार आहे. यात आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्यसेवक, वैद्यकीय अधिकारी, खासगी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश राहील.
सिल्लोड शहरात ६ केंद्रांवर तर तालुक्यातील ग्रामीण भागातील १५ केंद्रांवर अशा एकूण २१ केंद्रांवर शासकीय व खासगी हेल्थ वर्करांना ही लस देण्यात येणार आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. योगेश राठोड यांनी दिली.
लसीकरणाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने उपविभागीय कार्यालयात ब्रिजेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कोविड तालुका टास्क फोर्सची बैठक घेण्यात आली. या बैठकीला तहसीलदार विक्रम राजपूत, गटविकास अधिकारी डॉ. अशोक पा. दांडगे, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अमित सरदेसाई, डॉ. खंदारे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी सय्यद रफिक कंकर आदी उपस्थित होते.
ग्रामीण भागातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच भराडी, गोळेगाव, घाटनांद्रा, बनकिन्होळा अशा मोठ्या गावांमध्ये लसीकरण केंद्र राहणार आहे. कोविड लसीकरणाची पूर्वतयारी पूर्ण झाली असून, लस उपलब्ध होताच लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरणादरम्यान एखाद्याला रिॲक्शन आले, तर यासाठी तीन रुग्णालये राखीव ठेवण्यात आलेली आहेत. यात एक उपजिल्हा तर दोन खासगी रुग्णालयांचा समावेश आहे. या रुग्णालयांमध्ये मोफत उपचार करण्यात येणार असून, प्रत्येक केंद्रावर रुग्णवाहिका राहणार आहे, असे डॉ. योगेश राठोड यांनी सांगितले.