औरंगाबाद : प्रभू विश्वकर्मा जयंती शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी शांततेत व साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. सिडको एन-६ येथील विश्वकर्मा मंदिरात सकाळी दुग्धाभिषेक व आरतीचा कार्यक्रम झाला. त्यानंतर शिवपार्वती भजनी मंडळाने एकापेक्षा एक सरस भजने सादर केली. सुरेखा पगार यांनी स्वरचित भारूड सादर करून कोरोनाबद्दल जनजागृती केली.
‘कोरोनाच्या पायी दुनिया झाली सारी शांत; घरामध्ये बसावे... सर्वांनी निवांत,’ असे बोल असलेले भारूड पगार यांनी सादर केले. त्यांना कोकिळा जावळे, सोनूबाई राऊत, सुरेखा कोठावळे, समाधान जाधव, सीताराम सपकाळ, शामराव साळुंखे, सुभाष पवार, रतन जाधव यांनी साथसंगत केली.
विश्वकर्मा मंदिराचे अध्यक्ष अशोक पगार यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी विश्वकर्मा समाजाचे प्रश्न व ओबीसींच्या प्रश्नांवर चर्चा करून शासन ओबीसींचे कुठलेच प्रश्न सोडवत नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. ओबीसींनी मरगळ झटकून आता संघटित होण्याची व संघर्ष करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राजू सालपे यांनी सूत्रसंचालन केले. बबनराव पवार यांनी आभार मानले. जयवंत गायकवाड, विनोद भाग्यवंत, मोहन सपकाळ, वैभव सालपे, अमोल राजगुरू, आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. चंद्रकला दांडगे, शकुंतला शिरसाट व शोभा सोनवणे हे महाप्रसादाचे मानकरी ठरले. यावेळी वधू-वरांची नोंदणी करण्यात आली. मच्छिंद्र सालपे यांनी ही नोंदणी करून घेतली.
दरवर्षी विश्वकर्माची मिरवणूक निघत असते. यावेळी कोरोनामुळे ती रद्द करण्यात आली.