औरंगाबाद : कोरोनाच्या पहिल्या लाटेत गावबंदी करून अनेक गावे कोरोनामुक्त ठेवली होती. आता तपासणी व लसीकरण वाढवून गाव कोरोनामुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेने कंबर कसली आहे. कंटेन्मेंट झोनमध्ये आरोग्य यंत्रणेच्या मदतीला गटविकास अधिकारी, तालुका समन्वय अधिकारी आणि ग्रामदक्षता समितीत उपसरपंचांसह प्रतिष्ठित नागरिकांचा समावेश करून जबाबदाऱ्याचे वाटप मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मंगेश गोंदावले यांनी केले.
ग्रामीण भागातील कंटेन्मेंट झोनमध्ये कोरोनामुक्तीसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसाठी गटविकास अधिकारी व सहायक गटविकास अधिकाऱ्यांसह आरोग्य विभागासोबत चर्चा करून धोरण ठरविण्यात आले. आरोग्य विभागाने त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करून आरोग्य यंत्रणेला डेटा एन्ट्री, काॅन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी मदतीच्या जबाबदारीचे वाटप यावेळी करण्यात आले. जिल्ह्याच्या वाॅर रूमवर येणारा ताण लक्षात घेता तालुक्याला वाॅर रूम होणे गरजेचे होते. त्यामुळे सहायक गटविकास अधिकारी, सांख्यिकी विस्तार अधिकारी, डेटा एन्ट्री ऑपरेटर यांना ही जबाबदारी देण्यात आली. एका बाधिताच्या संपर्कातील २० व त्यांच्या संपर्कातील लोकांच्या नावांची नोंद करून तपासणीची माहिती विविध पोर्टलवर भरण्याच्या सूचनाही डाॅ. गोंदावले यांनी दिल्या, अशी माहिती पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. सुनील भोकरे यांनी दिली, तसेच गावे निवडून तपासणीची विशेष फेरी, कोरोनामुक्त गावांत १०० टक्के लसीकरण करण्याचे बैठकीत ठरविण्यात आले. आरोग्य उपसंचालक कार्यालयात पार पडलेल्या बैठकीस डाॅ. सुनील भोकरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. सुधाकर शेळके, जिल्हा साथरोग अधिकारी गोपाळ कुडलीकर, लसीकरण नोडल ऑफिसर डाॅ. पल्लवी पगडाल, जिल्हा लसीकरण अधिकारी विजय वाघ, जिल्हा क्षयरोग अधिकारी उल्हास गंडाळ यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
---
अधिक संक्रमित गावांवर लक्ष केंद्रित
---
बिडकीन, कुबेर गेवराई, खंडाळा, वासडी, चिंचपूर, पाल जाधववाडी, लासूर स्टेशन, तितूर, बाजारसावंगी, भालगाव, वरखेडी, तीसगाव, कुंजखेडा, लामणगाव येथे तालुका संपर्क अधिकारी, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक व तालुका आरोग्य अधिकारी यांच्या उपस्थितीत प्रत्येक गावात किमान १०० काॅन्टॅक्ट ट्रेसिंग करून तपासणीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. तेथे उद्दिष्टापेक्षा अधिक तपासणी करून घेण्यात यश आल्याचे डाॅ. भोकरे म्हणाले.
--
ग्रामदक्षता समितीच्या मदतीने
प्रत्येक गावात ही कामे करण्याचा निर्णय
--
-आरटीपीसीआर करण्यासाठीचा विरोध थांबविणे
-लसीकरणासाठी प्रोत्साहन देणे
-गावनिहाय टेस्टिंग व ट्रेसिंग वाढविणे
-कोरोनामुक्त गावात लसीकरण १०० टक्के करून घेणे
-कट्टे, चावड्या, पारांवर फवारणी करून घेणे
-मला काही होत नाही, असे म्हणणाऱ्या सुपर स्प्रेडरवर लक्ष ठेवणे
-त्रिसूत्री, तपासणी व लसीकरणाबद्दल जनजागृती
--