सलग आठव्या दिवशी
तापमान ३६ अंशावर
औरंगाबाद : शहरात उन्हाचा चटका वाढला असून, सलग आठव्या दिवशी तापमान ३६ अंशावर राहिले. चिकलठाणा वेधशाळेत कमाल तापमान ३६.२ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. दुपारच्या वेळी कडक उन्हाला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. आगामी दिवसांत तापमानात आणखी वाढ होत जाणार आहे.
आरटीओतील कर्मचाऱ्यांचीही तपासणी करा
औरंगाबाद : आरटीओ कार्यालयात प्रवेश करणाऱ्या वाहनधारकांची कोरोना तपासणी केली जात आहे; परंतु कार्यालयातील कर्मचाऱ्याची तपासणी केली जात नसल्याची ओरड वाहनधारकांतून होत आहे. कार्यालयातील कर्मचाऱ्याचीही तपासणी करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.
महावितरणमध्ये महिला दिन उत्साहात साजरा
औरंगाबाद : महावितरणच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त कृषी ऊर्जा पर्व साजरे करण्यात आले. 'महिला सक्षमीकरण-महावितरणचा पुढाकार' या संकल्पनेंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात आले. औरंगाबाद ग्रामीण मंडळ कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मीना शेळके होत्या. त्यांच्या हस्ते कृषी पंपाच्या वीज बिलाची थकबाकी भरणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला, तसेच थकबाकी वसूल करणाऱ्या महावितरणच्या महिला तंत्रज्ञांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अधीक्षक अभियंता संजय अकोडे, कार्यकारी अभियंता योगेश निकम, जितेंद्र वाघमारे, रामहरी काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. औरंगाबाद परिमंडळ कार्यालयात मुख्य अभियंता भुजंग खंदारे, तर शहर मंडळात अधीक्षक अभियंता बिभीषण निर्मळ यांच्या हस्ते महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
एसटी प्रवाशांना उड्डाणपुलापुढे-मागे उतरवू नका
औरंगाबाद : एसटी बसच्या उड्डाणपुलापुढे-मागे उतरविण्यात येऊ नये. त्यातून अपघाताची भीती नाकारता येत नाही. उड्डाणपुलाखाली थांबा असेल तर तेथेच बस थांबविण्यात यावी, उड्डाणपुलावर जाऊ नये, अशी सूचना एसटी महामंडळाच्या महाव्यवस्थापकांनी विभागीय कार्यालयाला केली आहे.