औरंगाबाद : संत साहित्याने समग्र जीवनाचे प्रभावी आणि परिणामकारक दर्शन घडविले असून, मराठी भाषेच्या जडणघडणीत संत साहित्याचे विविधांगी व भरीव योगदान आहे, असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक डॉ. विद्यासागर पाटंगणकर यांनी केले. स. भु. कला व वाणिज्य महाविद्यालयातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक २९ जानेवारी रोजी या पंधरवड्याच्या समारोपप्रसंगी ‘मराठी भाषेच्या विकासात संत साहित्याचे योगदान’ या विषयावर डॉ. विद्यासागर यांनी मार्गदर्शन केले. प्रभारी प्राचार्य डॉ. मकरंद पैठणकर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. डॉ. वृंदा देशपांडे यांनी प्रास्ताविक केले.
या पंधरवड्यादरम्यान ऑनलाईन काव्यवाचन, निबंध लेखन, सामान्यज्ञान चाचणी असे विविध उपक्रम महाविद्यालयात घेण्यात आले. मराठी विभागप्रमुख डॉ. ऋषिकेश कांबळे, उपप्राचार्य प्रा. संजय गायकवाड, डाॅ. नागेश अंकुश, प्रा. शाहू पाटील यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.