उस्मानाबाद : गत अनेक वर्षापासून बंद पडलेली सीटीस्कॅन मशीन सुरू होण्याच्या मार्गावर आहे़ या मशीनचे बिघडलेले दोन पार्ट बुधवारी जिल्हारूग्णालयात आले आहेत़ या पार्टची किंमत १७ लाख ८५ हजार इतकी असून, बंद पडलेली सीटीस्कॅन मशीन पूर्ववत सुरू होणार असल्याने रूग्णांसह नातेवाईकांना दिलासा मिळणार आहे़जिल्हा रूग्णालयातील सीटीस्कॅन मशीन ही सन २००५ ची आहे़ या मशीनचा कालावधी संपल्याने सतत तांत्रिक बिघाड निर्माण होत आहेत़ त्यातच आघाडी शासनाने जिल्हा रूग्णालयातील सीटीस्कॅन उपजिल्हा, ग्रामीण रूग्णालयात हलविण्याचा व तेथे खासगी कंपन्यांचे सीटीस्कॅन मशीन बसविण्याचा निर्णय घेतला होता़ या मशीनवरील तपासणीसाठी सर्वसामान्यांना हजारो रूपये मोजावे लागणार होते़ संबंधित कंपनीने जिल्हा रूग्णालयातील मशीन हलविण्याच्या हलचाली सुरू केल्यानंतर शहरातील राजकीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्त्यांनी याला विरोध दर्शविला होता़ त्यावेळी काही काळाचे आंदोलनही करण्यात आले होते़ शिवाय अनेक संघटनांनी ही मशीन हलविण्यास विरोध दर्शवित जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने दिली होती़ या सर्व प्रक्रियेदरम्यान ही मशीन बंद पडल्याने रूग्णांचे सीटीस्कॅन करण्यासाठी नातेवाईकांना खासगी ठिकाणीच जावे लागत होते़ सदर मशीन दुरूस्त करावी की नवीन घ्यावी, याबाबत रूग्णालय प्रशासनाने आरोग्य संचालकांकडे मार्गदर्शन मागविल्यानंतर आरोग्य संचालकांकडून दुरूस्तीची मान्यता देण्यात आली होती़ दुरूस्तीसाठी लागणारे १७ लाख ८५ हजार रूपये चेन्नई येथील कंपनीकडे वर्ग करण्यासाठी आरोग्य संचालकांकडून मान्यता मिळाल्यानंतर २४ डिसेंबर रोजी कंपनीकडे चेकद्वारे पैसे देण्यात आले होते़ २१ दिवसानंतर संबंधित कंपनीने सीटी स्कॅन मशीनचे ‘पार्ट फॉर तोषिबा सीटीस्कॅन व्हीपी पावर पीपी बोर्ड’नावाचे दोन पार्ट पाठविले असून, ते जिल्हा रूग्णालयास मिळले आहेत़ लवकरच हे पार्ट मशीनला बसविण्यात येणार आहेत़ (प्रतिनिधी)सीटीस्कॅन मशीनला बसविण्यासाठी लागणारे पार्ट जिल्हा रूग्णालयाकडे आले आहेत़ हे पार्ट बसविण्यासाठी संबंधित अभियंत्यांना बोलाविण्यात आले असून, लवकरच सीटीस्कॅन मशीन सुरू होणार आहे. सदर काम तातडीने पुर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ वसंत बाबरे यांनी सांगितले़सीटीस्कॅन मशीन ही सन २००५ ची आहे़ मशीनचा कालावधी संपल्याने सतत कोणत्या न कोणत्या तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत़ तांत्रिक बिघाड काढण्यासाठी दोन-चार महिन्यांचा कालावधी जात असल्याने रूग्णांचीही फरफट थांबत आहे़ शिवाय सातत्याने खर्च करावा लागत असल्याने जिल्हा रूग्णालयासाठी नवीन मशीनची आवश्यकता असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.
‘सिव्हील’मधील सीटीस्कॅन होणार सुरू
By admin | Updated: January 16, 2015 01:07 IST