जालना : देहेडकरवाडी परिसरात गेल्या दहा-बारा दिवसांपासून अत्यंत दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याची तक्रार काही नागरिकांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनाव्दारे केली.देहेडकरवाडी भागातील नळांना नाल्यातील तसेच स्वच्छतागृहातील दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होतो आहे. शनिवारी सायंकाळी मोठ्या प्रमाणावर दूषित पाण्याचा पुरवठा करण्यात आला. त्या दुर्गंधीयुक्त पाण्याचे नागरिकांनी तातडीने नमुने जमा केले. पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु नेहमीप्रमाणे मुख्याधिकाऱ्यांनी दूरध्वनी उचलला नाही. त्यामुळे नगर अभियंता बगळे यांच्याशीही संपर्क साधल्यानंतर तेही फिरकले नाहीत. त्यामुळे या भागातील नागरिकांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली. जुनी नगर पालिका कार्यालय ते पेशवे चौक या भागात नाल्यांचे काम व्यवस्थित न झाल्याचे निदर्शनास आणून दिले. दत्त मंदिर ते उढाण कॉम्प्लेक्स या परिसरात स्वच्छतागृहांचे पाणी मोठ्या प्रमाणावर नाल्यात सोडल्या जात असल्याने व नाल्या वाहत्या नसल्याने कित्येक दिवसांपासून हे नाल्यांचे पाणी रस्त्यावर जमा होते आहे. त्यामुळे नळांनाही या दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचे रसना देहेडकर, रमेश देहेडकर, शेख अब्दुल खुद्दूस, अभय पाटील, सतीश कुलकर्णी, नशिदाबी शेख, शेख बानू शेख अकबर, सुनीता कुलकर्णी, मनोज शिपोरकर, विनायक देहेडकर, लता देहेडकर, मुकुंद भाले, बळीराम घुले, ज्ञानेश्वर डोंगरे, मोहित देहेडकर, श्याम देहेडकर, रेखा पाटील आदींनी स्वच्छ पाणीपुरवठा करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. (प्रतिनिधी)पालिकेचे अक्षम्य दुर्लक्षया भागातील नागरिकांनी शनिवारी सायंकळी दूषित पाणीपुरवठा होत असतांना नगर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांसह उपमुख्याधिकारी तसेच अन्य लोकप्रतिनिधींना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपयोग झाला नाही. कुणीही दखल घेतली नाही.
देहेडकरवाडीत दूषित पाण्याचा पुरवठा
By admin | Updated: June 24, 2014 00:03 IST