उस्मानाबाद : ‘दाभोळकर हम शर्मिंदा है, आपके कातील जिंंदा है’, ‘शाहु-फुले-आंबेडकर, आम्ही सारे दाभोळकर’, अशा घोषणांनी गुरूवारी जिल्हाधिकारी परिसर दणाणला. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला दोन वर्ष उलटूनही मारेकरी सापडले नाहीत. त्यामुळे मारेकऱ्यांचा शोध घेण्यात अपयशी ठरलेल्या यंत्रणेच्या विरोधात अंनिसचे कार्यकर्ते व विविध संस्था, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. मारेकरी व त्यामागील सूत्रधारांना तात्काळ अटक करावी, या मागणीचे निवेदनही जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.लोकशाहीविरोधी प्रवृत्तींकडून डॉ. दाभोळकरांचा दिवसाढवळ्या खून करण्यात आला. घटना होवून दोन वर्षांचा कालावधी लोटला. असे असतानाही तपास यंत्रणा मात्र अद्यापही मुख्य सूत्रधार आणि मारेकऱ्यांपर्यंत पोहोचलेले नाहीत. अघोरी, अमानुष अंधश्रद्धेला विरोध आणि विवेकी जगण्यासाठी विधायक हस्तक्षेप करताना डॉ. दाभोळकर यांची हत्या झाली. खुनाच्या तपासातील विलंबामुळे कार्यकर्ते, सर्वसामान्य नागरिकांमध्ये अस्वस्थता व उद्वेगाची भावना निर्माण झाली आहे. विवेकी कृती करणाऱ्यांना समाज वेठीस धरीत असले तर अशा कृत्ती हजारवेळा करू, असा संदेशही अनेक घोषणांमधून देण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनही केले. त्यानंतर ९० कार्यकर्त्यांनी नेत्रदान, अवयव दान, आणि देहदानाचा संकल्प करीत डॉ. दाभोळकरांना अभिवादन केले. विवेकाचा आवाच यापुढेही असाच बुलंद करू, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दाभोळकरांचा खून, तपासातील दिरंगाईबाबत सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मनात असलेला रोष निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आला. यावेळी अंनिसचे अध्यक्ष एम. डी. देशमुख, कार्याध्यक्ष भाग्यश्री वाघमारे, सचिव बालाजी तांबे, अॅड. राज कुलकर्णी, रवींद्र केसकर, राष्ट्रसेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अॅड. देवीदास वडगावकर, नगरसेवक पृथ्वीराज चिलवंत, प्रा. भालचंद्र जाधव, मुख्याध्यापक संघाचे एस. डी. कुंभार, रेल्वे लोकआंदोलन समितीचे प्रभाकर निपाणीकर, पत्रकार सुनिल ढेपे, हुंकार बनसोडे, मल्लीकार्जुन सोनवणे, रोहन खुने, आम आदमी पार्टीचे अभिजित साहू, अंनिसचे शितल वाघमारे, राकेश वाघमारे, विश्वदीप खोसे, अॅड. गोपाळ पाकले, अॅड. अजय वाघाळे, अॅड. रवींद्र मैंदाड, स्वानंदी वडगावकर, सी. एस. नवले, अनंत बिरादार आदींसह विविध संस्था, संघटनांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. उपस्थित होते. (प्रतिनिधी) अंनिसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते अशा ९० जणांनी जिल्हा शासकीय रूग्णालयात विहित नमुन्यात मरणोत्तर अवयव दान करण्यासाठीची लेखी अनुमती सादर केली आहे. हाच विचार लौकिक अर्थाने रूजविण्यासाठी ज्यांच्या जीवनात निसर्गाच्या अवकृपेमुळे अंधार झाला आहे, त्यांना मरणोत्तर नेत्रदानामुळे उजेडाचे दर्शन होणार आहे. दाभोळकरांना अभिवादन करण्यासाठी या अनोख्या माध्यमातून नेत्रदान, अवयव दान आणि काही जणांनी देहदान करण्याचा संकल्प करण्याचा निर्णय घेतला आहे.
अवयव दानाचा ९० जणांचा संकल्प
By admin | Updated: August 21, 2015 00:40 IST