विठ्ठल कटके ; रेणापूरमागील अडीच वर्षापासून रेणापूर पंचायत समितीचे सभापती, उपसभापतीपद काँग्रेसकडे होते़ यावेळी पुढील अडीच वर्षांसाठी ही दोन्ही पदे काँग्रेसकडेच राहिली़ यावेळी भाजपाने ही दोन्ही पदे आपल्याकडे यावीत म्हणून चाचपणी केली़ परंतु, त्यात त्यांना यश मिळाले नाही़ दोन्ही पदांची निवड होईपर्यंत आत काय चालले आहे़ याबाबत काँग्रेस भाजपा कार्यकर्त्यांमध्ये कमालीची उत्सुकता होती़ रेणापूर पंचायत समितीत काँग्रेसचे ५, भाजपाचे ३ असे पक्षीय बलाबल आहे़ १४ मार्च २०१२ ला झालेल्या सभापती, उपसभापती पदावर काँग्रेस पक्षाचे वर्चस्व होते़ यावेळी रेणापूर पंचायत समितीचे सभापतीपद ओबीसीसाठी आरक्षित राहिला़ काँग्रेसच्या भागीरथी बनसोडे या गरसुळी गणातून निवडून आल्या़ तर भाजपाचे संपत कराड कारेपूर ओबीसी प्रवर्गातून निवडून आले़ तसेच रेणापूर पंचायत समिती सर्वसाधारण प्रवर्गातून प्रदीप राठोड हे काँग्रेसकडून निवडून आले़ १४ मार्च २०१२ रोजी झालेल्या निवडणुकीत सभापती अनिता पवार यांची वर्णी लागली़ तर उपसभापती प्रदीप राठोड विराजमान झाले होते़ यावेळी काँग्रेसच्या भागीरथी बनसोडे यांनी सभापतीपद मिळावे म्हणून जोरदार फिल्डिंग लावली होती़ त्यांना सभापतीपद मिळणार अशी चर्चा तालुक्यात होती़ परंतु, सभापतीपद हे महिलेसाठी आरक्षित नसल्यामुळे या पदासाठी खुल्या प्रवर्गातून निवडून आलेले ओबीसी प्रवर्गातील प्रदीप राठोड यांनीही या पदासाठी मोर्चेबांधणी केली होती़ प्रदीप राठोड हे ओबीसी प्रवर्गातून निवडून आले नसतानाही त्यांच्या मागील अडीच वर्षाच्या कालावधीत केलेल्या जनसामान्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांची सभापतीपदी वर्णी लागली़ तरी पंचायत समितीमधील काँग्रेसचे गटनेते अप्पासाहेब पाटील व दर्जी बोरगावचे बाळकृष्ण माने यांच्या नावाची उपसभापती पदासाठी चर्चा होती़ यामध्ये श्रेष्ठीने बाळकृष्ण माने यांच्या नावाला अनुमती दिल्यामुळे उपसभापती म्हणून बाळकृष्ण माने यांची निवड झाली़ महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार तालुक्याच्या ठिकाणच्या ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळणार असल्यामुळे रेणापूर तालुक्यात चार जिल्हा परिषद गणापैकी रेणापूर व आठ पंचायत समिती गणापैकी रेणापूर १, दर्जीबोरगावसह तीन गण पुढील जि़प़ निवडणुकीत कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे़ त्यामुळे रेणापूर व दर्जीबोरगाव या पंचायत समिती गणातील प्रदीप राठोड व बाळकृष्ण माने यांची वर्णी लागली आहे़
भाजपाच्या चाचपणीवर काँग्रेसची मात
By admin | Updated: September 18, 2014 00:40 IST