औरंगाबाद : शिवसेनेने औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या पाचपैकी तीन विधानसभा मतदारसंघांतील उमेदवार अंतिम केले असले तरी पक्षाचे उपनेते तथा खा. चंद्रकांत खैरे यांनी इच्छुकांचा जीव टांगणीला लावला आहे. एकाच दगडात अनेक पक्षी मारणारी मुक्त राजकीय विधाने ते पत्रकारांशी बोलताना करीत आहेत. मनसेच्या संपर्कात असणाऱ्यांना तंबी देत आहेत. तर मध्य, पैठण, गंगापूरमधून इच्छुक असलेल्या उमेदवारांची फिरकी घेत आहेत. गंगापूर- खुलताबाद आणि मध्य मतदारसंघामध्येच स्पर्धा लावली असून, अंतर्गत वादाला पक्षातूनच फोडणी दिली जात आहे. मध्य मतदारसंघात डबल गेम, तर गंगापूर मतदारसंघात स्पर्धा वाढावी यासाठी स्थानिक नेत्यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शहरातील पश्चिम, ग्रामीण भागातील कन्नड, वैजापूर येथील विधानसभा मतदारसंघातील उमेदवार निश्चित केलेले आहेत. मध्य आणि गंगापूर मतदारसंघात उमेदवारीसाठी जोरदार स्पर्धा लागली आहे. मध्य मतदारसंघात विद्यमान आ. प्रदीप जैस्वाल हे पक्षात आल्यामुळे त्यांचा पहिला दावा आहे. माजी आ. किशनचंद तनवाणी हे पक्षादेशाने विधान परिषद लढून पडले. त्यामुळे त्यांनाही उमेदवारी हवी आहे. सुहास दाशरथे मनसेच्या वाटेवर जाणार होते. मात्र, खा. खैरे यांनी त्यांना सहसंपर्कप्रमुख करून स्वगृृही रोखले. महापौर कला ओझा यादेखील मध्य मतदारसंघातून उमेदवारी मागत आहेत. खा. खैरेदेखील त्यांना प्रमोट करीत आहेत, तर उपजिल्हाप्रमुख नंदकुमार घोडेले हेदेखील उमेदवारीच्या स्पर्धेत आहेत. खा. खैरे यांनी आ. जैस्वाल यांना त्यांचे मध्यवर्ती प्रचार कार्यालय दिले आहे. दुसरीकडे ते महापौरांचे काम चांगले असल्याचा गवगवा करीत आहेत, तर तिसरीकडे आ. तनवाणी यांच्यासोबत फारसे सख्य नसताना त्यांच्या कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. दाशरथे यांनाही त्यांनी काहीतरी कानमंत्र दिला आहे. मध्य मतदारसंघात उमेदवारीवरून डबलगेम सुरू असल्याचे दिसते. बंब यांचा बोलविता धनी मी नाहीगंगापूर मतदारसंघातून आ. प्रशांत बंब यांना सेनेत प्रवेश हवा आहे. यावर खा.चंद्रकांत खैरे म्हणाले, त्यांच्या प्रवेशाचा मुद्दा ठाकरे यांच्या कोर्टात आहे. आ. बंब यांच्या प्रवेशाचा बोलविता धनी आपण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जरी पक्षात कुणी नवीन आले तरी त्यांना सैनिक म्हणूनच राहावे लागेल, असेही ते म्हणाले. गंगापूरमध्ये अण्णासाहेब माने, दिनेश मुथा, संतोष माने हे आहेत. जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांचे नाव त्यांनी इच्छुकांमध्ये घेतले नाही. दानवे हेदेखील इच्छुक आहेत, असे म्हटल्यावर खा.खैरे म्हणाले, हो तेही इच्छुक आहेत. म्हणजे त्यांनी दानवे यांनाही इच्छुकांमध्ये घुसविले आहे. इच्छुकांची समजूत काढावी लागेल. कुणी अंगावर आले तर पाहून घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले. ओव्हर कॉन्फिडन्स नाहीसेनेला ओव्हर कॉन्फिडन्स नाही. महायुतीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व मान्य केले आहे. सर्वांना काम करावेच लागेल. स्वाभिमानी संघटनेचा इशारा दबावतंत्राचा प्रकार आहे. सेनेच्या १५० जागा निवडून आणायच्या आहेत. भाजपाच्याही निवडून आणू. मुख्यमंत्री सेनेचा होईल. पैठणची जागा महादेव जानकरांनी मागितली होती. मात्र, ती जागा सेनेची आहे, असे खैरै यांनी स्पष्ट केले.
गंगापूरमध्ये स्पर्धा; मध्यमध्ये डबल गेम
By admin | Updated: August 30, 2014 00:17 IST