उस्मानाबाद : शहरातील वर्दळीच्या ठिकाणी विविध वस्तू, खाद्यपदार्थ विक्री करणारे गाडे थांबतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होते. याचा फटका पदचाऱ्यांसोबतच वाहनधारकांनाही सोसावा लागतो. सातत्याने निर्माण होणारा हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी पालिका नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी बुधवारी हॉकर्सची बैठक बोलावली असता ‘हॉकर्स झोन’ निश्चित करण्यासाठी समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही समिती जागेचा अभ्यास करून अहवाल देईल. त्यानंतर योग्य जागा निश्चित केली जाईल, असेही यावेळी ठरले.शहातील बसस्थानक परिसर, काळा मारूती चौक आदी भागात फळ, खाद्य पदार्थ, वस्तू विक्रेत्यांचे गाडे लागलेले असतात. त्यामुळे विशेषत: सायंकाळच्या सुमरास या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होते. याचा फटका वाहनधारकांसोबतच पादचाऱ्यांनाही सोसावा लागतो. बसस्थानकासमोरील रस्त्याच्या कडेने पदपाथ निर्माण करण्यात आले आहेत. परंतु, हा पदपाथ सध्या फळविक्रेते उपयोगात आणत आहेत. त्यामुळे येथून ये-जा करणाऱ्या प्रवाशांसोबतच नागरिकांना जीव मुठीत धरून मार्ग काढावा लागतो. काही महिन्यांपूर्वी पालिका प्रशासनाने पदपाथावरील फळविक्रेत्यांची दुकाने हटविण्यात आली होती. काही दिवसानंतर पुन्हा पदपाथावर दुकाने थाटली आहेत. त्यामुळे ज्या उद्देशासाठी हा खर्च केला आहे, तो उद्देश सफशेल फोल ठरत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, नगर परिषदेकडे नागरिकांकडे वारंवार तक्रारी येत होत्या. त्यामुळे हा प्रश्न निकाली काढण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. त्यानुसार नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी ‘हॉकर्स’ची बैठक बोलावण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार बुधवारी नगराध्यक्षांच्या उपस्थित बैठक झाली. यावेळी हॉकर्स झोन तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, उपाध्यक्ष खलिपा कुरेशी, मुख्याधिकारी शशिमोहन नंदा यांच्यासह हॉकर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
समितीमार्फत होणार ‘हॉकर्स झोन’ निश्चिती !
By admin | Updated: August 6, 2015 00:04 IST