औरंगाबाद : महापालिकेतील शिवसेनेचे स्वीकृत सदस्य गोपाल कुलकर्णी यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे पद मिळविल्याची तक्रार आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्याकडे करण्यात आली आहे. त्या आधारे आयुक्त डॉ. कांबळे यांनी काल २ जुलै रोजी सदस्य कुलकर्णी यांना नोटीस बजावून आठ दिवसांत बाजू मांडण्याची मुदत दिली आहे. विधि व निवडणूक विभागाकडे त्या तक्रारीतील तथ्य तपासणी झाल्यानंतर नोटीस बजावण्यात आली आहे. कुलकर्णी यांनी गारखेडा परिसरातील चौंडेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य असल्याचे प्रमाणपत्र स्वीकृत सदस्य निवडणूक वेळी सादर केले होते. नवीन नियमानुसार सेवाभावी संस्था अथवा सामाजिक संस्थेवर काम करणाऱ्यांना ते पद मिळण्याची तरतूद करण्यात आली. त्यामुळे कुलकर्णी यांनी शिक्षण संस्थेचा सहा वर्षांपासून सदस्य असल्याचा पुरावा ५ जून २०१० रोजी सादर केला. संबंधित संस्थेला १८ मार्च २००५ रोजी सहायक धर्मादाय आयुक्तांकडून पहिले प्रोव्हिजनल सर्टिफिकेट देण्यात आले व अंतिम प्रमाणपत्र २६ मे २००५ रोजी देण्यात आले. त्यामुळे २०१० च्या जून महिन्यात संस्थेला पाच वर्षांचा कालावधी होतो. संस्थेच्या चेंज रिपोर्टमध्ये २००५ पासून २०१५ पर्यंत व निवडणुकीमध्ये कुलकर्णी यांचा कुठेही उल्लेख नाही. संस्थेने ते सभासद असल्याचा कोणताही ठराव घेतलेला नाही. कुलकर्णी यांनी जे शपथपत्र दाखल केले व जो आॅडिट रिपोर्ट दाखल केला त्याचा धर्मादाय आयुक्तांकडे कोणताही दाखला नाही, असा दावा तक्रारकर्ते प्रमोद नरवडे यांनी केला आहे. नियमानुसार शासनाची, मनपाची व शैक्षणिक संस्थेची फसवणूक केल्याचा हा प्रकार आहे. त्यांच्यावर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. १२७ पानांची तक्रारचार वर्षांनंतर माहिती अधिकारामुळे ही माहिती उजेडात आल्यामुळे पालिकेच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. नियमानुसार शासनाची, मनपाची व शैक्षणिक संस्थेची फसवणूक केल्याचा हा प्रकार आहे. त्यांच्यावर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी प्रमोद नरवडे पाटील यांनी तक्रारीत केली आहे. प्रशासनाने १२७ पानांची तक्रार ठेवून घेतली असून, चौकशी करण्याच्या दिशेने तयारी सुरू केली आहे.
शिवसेनेच्या त्या स्वीकृत सदस्याला आयुक्तांची नोटीस
By admin | Updated: July 4, 2014 01:09 IST