औरंगाबाद : मनपा आयुक्त पी.एम. महाजन आणि भाजपा गटनेते संजय केणेकर यांच्यात शुक्रवारी दुपारी जोरदार वाद झाला. प्रकरण चक्क एकमेकांना शिवीगाळ, धमकी देण्यापर्यंत गेले. यावेळी आयुक्तांनी ‘धुळ्याहून गुंड मागवून हात-पाय तोडून टाकीन. यापुढे तू कसा जगतो आणि तुला कोण जगवितो ते मी पाहतो.’ अशा शब्दात धमकी दिल्याची तक्रार केणेकर यांनी सिटीचौक पोलीस ठाण्यात केली आहे. तर आयुक्त महाजन यांनी तक्रारीतील आरोपांचे खंडण केले असून उलट केणेकर हेच चढत्या आवाजात बोलल्याचा खुलासा केला.आयुक्तांच्या विरोधात जिवे मारण्याची धमकी देण्याची तक्रार ही पहिलीच घटना म्हणावी लागेल. यापूर्वीही पालिकेत तत्कालीन आयुक्त असीम गुप्ता, डॉ. पुरुषोत्तम भापकर, डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या काळात पदाधिकारी विरुद्ध आयुक्त असे वाद झाले. डॉ. भापकर यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार झाली होती. आयुक्त महाजन यांची पदाधिकाऱ्यांसोबत शिवीगाळ, वाद होण्याची ही दुसरी घटना आहे. गेल्या महिन्यात नगरसेवक अमित भुईगळ आणि आयुक्तांमध्ये शिवीगाळ झाली होती. केणेकर यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, आयुक्त महाजन यांच्या दालनात कर्मचाऱ्यांच्या मुदतवाढीप्रकरणी जात असताना दु. १२ वा. सुरक्षारक्षकांनी रोखले. दालनामध्ये आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री कुलकर्णी व आयुक्त आहेत. आत कुणालाही सोडू नये, असा आयुक्तांचा आदेश आहे, असे सुरक्षारक्षकांनी सांगितले. त्यानंतर दोन वेळा आयुक्तांच्या दालनाकडे गेलो; परंतु आत जाण्याची संधी मिळाली नाही. तिसऱ्यांदा आत गेल्यानंतर आयुक्त म्हणाले की, ‘हा लवकर बोला, मला वेळ नाही.’ आमच्यात संभाषण चालू असताना महागाई भत्त्याची मागणी करण्यासाठी मनपाचे शेकडो कर्मचारी आयुक्तांच्या दालनात आले. त्यांच्यासोबत छायाचित्रकारही होते.आयुक्तांच्या दालनात काय झाले?कर्मचारी आत येताच आयुक्त म्हणाले की, सगळे काम बंद करून येथे कशासाठी आले आणि सोबत पत्रकार, छायाचित्रकार कशाला आणले. आपले कर्मचारी आहेत. चर्चेपूर्वीच पत्रकारांना सोबत आणण्याची ही काय पद्धत आहे. केणेकर म्हणाले की, हे आपले कर्मचारी आहेत. त्यांना शिवीगाळ, अवमानास्पद बोलू नका. आयुक्त केणेकरांना म्हणाले की, तुम्ही गप्प बसा, तुम्ही काय सर्वांचे वकीलपत्र घेतले आहे काय, सुरक्षारक्षकांना हाकला. छायाचित्रकार आणि मनपाच्या कर्मचाऱ्यांना, सगळ्यांना बाहेर काढा. यावर केणेकर म्हणाले की, तुमची ही पद्धत चुकीची आहे. छायाचित्रकार आणि आयुक्तांमध्येही शाब्दिक वाद झाला. शहर अभियंता एस.डी. पानझडे यांनी मध्यस्थी केली, तर सुरक्षारक्षकांनी विनंती करून छायाचित्रकारांना बाहेर काढले. दालनातून सर्व बाहेर आल्यानंतर केणेकर आणि आयुक्तांमध्ये वाद सुरू झाला. दोघांत शिवीगाळ होण्यापर्यंत प्रकरण गेले. धुळ्याचे गुंड आणून हात-पाय तोडून टाकीन, अशी धमकी आयुक्तांनी दिल्यामुळे केणेकर यांनी पोलीस ठाणे गाठले, तर आयुक्तांनी तातडीने कार्यालय सोडून बंगला जवळ केला. छायाचित्रकारांना हाकललेआयुक्तांनी सुरक्षारक्षकांना छायाचित्रकारांना दालनाबाहेर काढण्याचे आदेश दिले. विनापरवानगी तुम्ही आत कसे काय आलात, असा सवाल आयुक्तांनी केला. यावरून आयुक्त व काही वर्तमानपत्रांच्या छायाचित्रकारांमध्ये वाद झाला. दरम्यान, जिल्हा पत्रकार संघ व फोटोग्राफर असोसिएशनने प्रभारी विभागीय आयुक्त विक्रमकुमार यांच्याकडे आयुक्तांनी केलेल्या अरेरावीप्रकरणी तक्रार केली आहे. प्रभारी आयुक्त म्हणाले की, विभागीय आयुक्त जयस्वाल रजेवर आहेत. ते आल्यावर पत्रकार, छायाचित्रकारांचे निवेदन त्यांच्याकडे जाईल. असा हा योगायोग.गेल्यावर्षी केणेकर यांची खा. चंद्रकांत खैरे यांच्या सोबत १ जानेवारी २०१४ रोजी हुज्जत झाली होती. त्यावरून भाजपा- सेनेत वर्षभर वादंग उभे राहिले. त्यानंतर केणेकर यांची नववर्षाच्या दुसऱ्या दिवशी आयुक्त महाजन यांच्यात शिवीगाळ होण्याची घटना घडली. असा हा योग नववर्षाच्या सुरूवातीला जुळून आला. चार महिन्यांत फक्त वादच३ जानेवारी रोजी आयुक्तांना मनपात येऊन चार महिने पूर्ण होत आहेत. या चार महिन्यांत आयुक्त आणि पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांत वाद होण्याशिवाय दुसरे काहीही घडलेले नाही. विकासकामांवर चर्चा होत नाही. संचिका तुंबल्या आहेत. नगरसेवकांचा त्यांच्याबरोबर रोज संचिकांवरून वाद होत आहे. कंत्राटदारांची बिले थकलेली आहेत. त्यामुळे रस्ते, ड्रेनेज, जलवाहिन्या टाकण्याची कामे बंद आहेत. पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. पथदिवे बंद पडलेले आहेत. अशा परिस्थितीत मार्ग काढण्याचा कुठलाही निर्णय होत नसून करवसुली आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे काम प्रशासन करीत आहे. उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना आयुक्तांकडून रोज शिव्यांचा प्रसाद मिळत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.आयुक्त म्हणाले...धमकी देण्याचा कुठलाही प्रकार घडलेला नाही. छायाचित्रकारदेखील तेथे होते. उलट केणेकर हेच आवाज चढवून बोलत होते. दालनात अधिकारी, कर्मचारी होते. त्यांच्या समक्षच सर्व प्रकार घडला आहे. त्यामुळे सर्वांना माहिती आहे, काय घडले. सीसीटीव्ही कॅमेरा दालनात आहे की नाही हे माहिती नाही. असेल तर त्याचे चित्रीकरणही सत्य काय ते सांगेल, असे आयुक्त महाजन यांनी सांगितले. दरम्यान, दालनात उपस्थित अधिकाऱ्यांनी सांगितले की, आयुक्त आणि केणेकर यांच्यात वाद झाला; परंतु धमकी देण्याचा प्रकार घडलेला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रधान सचिवांकडे आयुक्त पी.एम. महाजन यांची तक्रार करण्यात आली आहे. उपमहापौर संजय जोशी यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली. तसेच त्या तक्रारीसोबत पत्रकार, छायाचित्रकार संघटनेने प्रभारी विभागीय आयुक्त विक्रमकुमार यांच्याकडे केलेली तक्रारही जोडून पाठविली. विरोधी पक्षनेते रावसाहेब गायकवाड यांनीही आयुक्तांची तक्रार प्रधान सचिवांकडे केली आहे. भाजपाचे पदाधिकारी, नगरसेवक आयुक्तांच्या बदलीची मागणी शासनाकडे करणार आहेत.
आयुक्त म्हणतात... गुंड आणून हात-पाय तोडेन
By admin | Updated: January 3, 2015 00:17 IST